पश्चिम बंगालच्या राजकारणात गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसशी संबंधित मानल्या जाणाऱ्या आय-पॅक या पॉलिटिकल कन्सल्टन्सी फर्मच्या ठिकाणांवर छापे टाकले. या कारवाईनंतर राज्याच्या राजकारणात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून ममता बॅनर्जी यांनी थेट केंद्र सरकार आणि केंद्रीय यंत्रणांवर गंभीर आरोप केले आहेत.
ईडीने कोलकात्यातील मध्यवर्ती भागात आय-पॅकच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी एक असलेल्या प्रतीक जैन यांच्या निवासस्थानी छापा टाकला. याशिवाय सॉल्ट लेक परिसरातील सेक्टर पाचमधील गोदरेज वॉटरसाइड इमारतीत असलेल्या आय-पॅकच्या कार्यालयातही तपास करण्यात आला. प्रतीक जैन हे ममता बॅनर्जी यांच्या निवडणूक रणनीती टीममधील महत्त्वाचे सदस्य असल्याचे सांगितले जाते.
या छाप्यांची माहिती मिळताच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवर त्यांच्या पक्षाचे महत्त्वाचे कागदपत्रे उचलून नेल्याचा आरोप केला. ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, ईडीचे अधिकारी त्यांच्या पक्षाशी संबंधित फायली घेऊन जात होते आणि कार्यालयात कोणतीही सुरक्षा व्यवस्था नव्हती. त्यामुळेच काही फायल सुरक्षित ठेवण्यासाठी त्या तातडीने त्यांच्या ताफ्यातील वाहनात ठेवण्यात आल्या.
या घटनेदरम्यान ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही थेट निशाणा साधला. त्यांनी अमित शाह यांना उपरोधिक शब्दांत शरारती गृहमंत्री असे संबोधले. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ही संपूर्ण कारवाई केंद्र सरकारच्या सूचनेवरून होत असून त्यामागे राजकीय हेतू आहे. अमित शाह आमच्या पक्षाच्या उमेदवारांची यादी, निवडणुकीची रणनीती आणि अंतर्गत कागदपत्रे मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
ईडीच्या छाप्याची बातमी पसरताच तृणमूल काँग्रेसचे अनेक नेते आणि कार्यकर्ते सॉल्ट लेक येथील कार्यालयाबाहेर जमा झाले. त्यामुळे तणाव अधिक वाढला. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी बिधाननगरचे पोलीस आयुक्तही घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीला ममता बॅनर्जी एका ठिकाणी होत्या, मात्र नंतर त्या स्वतः सेक्टर पाचमधील कार्यालयात पोहोचल्या.
दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी वाहनात ठेवलेल्या फायलींमध्ये नेमकी कोणती माहिती आहे, याबाबतही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या फायलींमध्ये काय आहे आणि त्या का सुरक्षित ठेवण्यात आल्या, याचे स्पष्ट उत्तर तृणमूल काँग्रेस किंवा ईडीकडून अधिकृत निवेदन आल्यानंतरच समोर येईल. एकूणच, ईडीच्या या छाप्यांमुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा एकदा केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील संघर्ष उफाळून आला आहे. येत्या काळात या प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.