

Education Ministry: शिक्षण क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी झटणाऱ्या शिक्षकांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या वतीने दिला जाणारा सन २०२६ चा 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार' जाहीर झाला असून, त्यासाठी राज्यातील पात्र शिक्षकांकडून ऑनलाइन स्व-नामांकने मागवण्यात आली आहेत.
इच्छुक आणि पात्र शिक्षकांनी येत्या १० जुलैपर्यंत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. महेश पालकर यांनी केले आहेत. केंद्राच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने यंदा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी सुधारित मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
या नव्या नियमांनुसार, शिक्षकांना आता कोणाच्या शिफारशीची वाट न पाहता स्वतःचे नामांकन स्वतःच दाखल करता येणार आहे. ही ऑनलाइन प्रक्रिया १५ जूनपासूनच सुरू झाली असून, शिक्षण संचालकांनी तात्काळ पावले उचलत राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि संबंधित यंत्रणांना याबाबतचे निर्देश जारी केले आहेत.
कोणाला मिळणार संधी?
केंद्र सरकारकडून दिला जाणारा हा पुरस्कार म्हणजे देशातील शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान मानला जातो. यंदा या शर्यतीत उतरण्यासाठी राज्यातील शासकीय शाळा, जिल्हा परिषद, महानगरपालिका अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, तसेच मान्यताप्राप्त अनुदानित खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक आणि मुख्याध्यापकांना आपले नशीब आजमावता येणार आहे. शिक्षण क्षेत्रात ग्राउंड लेव्हलवर उल्लेखनीय काम करणाऱ्यांनाच यात प्राधान्य मिळत असते.
असे आहे वेळापत्रक
शिक्षकांना आपले अर्ज अंतिम स्वरूपात सादर करण्यासाठी १३ जुलैपर्यंतची मुदत असली, तरी स्व-नामांकन सादर करण्याची अंतिम तारीख १० जुलै २०२६ हीच असणार आहे. इच्छुक शिक्षकांना nationalawardstoteachers.education.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. आता राज्यातील किती कल्पक आणि अभ्यासू शिक्षक या राष्ट्रीय पुरस्कारावर आपलं नाव कोरणार, याकडे राज्याच्या शिक्षण वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.