कोलकता : कोलकता महापालिकेच्या (Kolkata Municipal Corporation) निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने (TMC) मोठा विजय मिळवला होता. तृणमूलने भाजपसह (BJP) काँग्रेस (Congress) आणि डाव्यांची (Left Parties) दाणादाण उडवली होती. या तीनही पक्षांना दुहेरी आकडाही पार करता आला नव्हता. आता कोलकत्याच्या महापौरपदी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचे विश्वासू फिरहाद हकीम (Firhad Hakim) यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हकीम हे विद्यमान कॅबिनेट मंत्री असून, त्यांच्याकडे परिवहन आणि गृहनिर्माण खात्याची जबाबदारी आहे.
कोलकाता महापालिकेच्या 144 जागांपैकी 134 जागा तृणमूलने जिंकल्या आहेत. मागील निवडणुकीपेक्षा पक्षाने दहा जागा जास्त मिळवल्या आहेत. आता महापौरपदी हकीम यांची निवड झाली आहे. कोलकता महापालिकेचे 39 वे महापौर म्हणून लवकरच ते शपथ घेतील. स्वांतत्र्यानंतर महापौरपदी विराजमान होणारे ते पहिले मुस्लिम ठरतील. हकीम हे महापालिकेच्या 82 क्रमांकाच्या वॉर्डमधून निवडून आले आहेत. ते कोलकता बंदर मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. आमदार अतिन घोष यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे.
खासदार माला रॉय यांची महापालिकेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्या 88 क्रमांक वॉर्डमधून निवडून आल्या आहेत. त्या आधीही अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत होत्या. दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी महापालिकेतील विजयनांतर सर्वच नेत्यांना तंबी दिली आहे. महापालिकेच्या कामगिरीची दर सहा महिन्यांनी आढावा घेण्याची घोषणा त्यांनी केली आहे. यात काम न करणाऱ्या नेत्यांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) ऐतिहासिक विजय मिळवत ममता बॅनर्जी यांनी सत्ता मिळवली. या निवडणुकीत भाजपने प्रतिष्ठा पणाला लावली होती. ममतांनी विधानसभा निवडणुकीत एकहाती विजय मिळत विरोधकांना धूळ चारली होती. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसने बाजी मारली आहे. कोलकता महापालिका निवडणुकीतही ममतांनी विरोधकांना धक्का दिला आहे.
कोलकता महापालिकेच्या 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीत तृणमूलला 124 जागा मिळाल्या होत्या. तर भाजपच्या पदरात केवळ पाच जागा पडल्या होत्या. तसेच डाव्यांनाही पाचच जागांवर समाधान मानावे लागले होते. काँग्रेसला केवळ दोन जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत भाजप व डाव्यांना मागील आकडाही टिकवता आला नाही. भाजपला केवळ तीन जागा मिळाल्या असून डावे पक्ष व काँग्रेसला प्रत्येकी दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. इतरांनी तीन जागा मिळाल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.