New Delhi : दिल्ली विधानसभेची निवडणुकी पुढील काही महिन्यांवर आलेली असताना भाजपने आम आदमी पक्षाला मोठा धक्का दिला आहे दिल्ली महापालिकेतील आपच्या पाच नगरसेवकांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच एका माजी आमदारांनी आपला सोडचिठ्ठी दिली आहे.
राम चंद्र, पवन सेहरावत, मंजू निर्मल, सुगंधा बिधूडी आणि ममता पवन अशी पाच नगरसेवकांची नावे आहेत. दिल्लीच्या राजकारणात विधानसभेआधी हा पहिला मोठा भूकंप मानला जात आहे. दिल्ली महापालिकेसह राज्यातही आपची सत्ता आहे. मात्र, पाच नगरसेवक भाजपमध्ये गेल्याने महापालिकेत आपला कोणताही धोका नाही.
मागील काही महिन्यांपासून आपला सातत्याने मोठे धक्के बसत आहेत. सुरूवातीला माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना भ्रष्टाचार प्रकरणात जेलमध्ये जावे लागले. त्यानंतर याच प्रकरणात खासदार संजय सिंह आणि नंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना ईडीने अटक केली. केजरीवाल अजूनही जेलमध्येच आहेत.
बड्या नेत्यांना जेलमध्ये जावे लागल्याने आपच्या पक्षसंघटनेमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. यापार्श्वभूमीवर पाच नगरसेवकांनी रामराम ठोकल्याने आपची चिंता वाढली आहे. या पक्षप्रवेशानंतर आपने भाजपवर टीका केली. नगरसेवकांवर भाजपने दबाव टाकला होता. त्यांना धमकावून पक्ष सोडण्यासाठी तयार करण्यात आले. लोकशाहीविरोधातील हे एक षडयंत्र असल्याची टीका आप प्रवक्त्यांनी केली आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला पक्षप्रवेशाचा फायदा होऊ शकतो, असे मानले जात आहे. संबंधित नगरसेवकांची ताकद असलेल्या भागात भाजप प्रभाव पाडू शकतो. त्यामुळे आपसाठी हे आव्हानात्मक ठरणार आहे. पुढील काळात भाजपकडून आणखी धक्के दिले जाऊ शकतात.
मनिष सिसोदिया यांनी राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. राज्याच्या विविध भागांत ते पदयात्रा काढून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. पण दुसरीकडे भाजपकडून धक्के देण्यास सुरूवात झाल्याने आपची डोकेदुखी वाढली आहे. विधानसभा निवडणुकीआधी केजरीवालांना जामीन मिळाला तर पक्षाला काही प्रमाणात फायदा होऊ शकतो, अशीही चर्चा आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.