Ranchi : झारखंडमध्ये भाजपच्या अनेक प्रमुख नेत्यांवर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेते, केंद्रीय मंत्र्यांसह तब्बल 12 हजारांहून अधिक कार्यकर्त्यांना गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एका मोर्चादरम्यान पोलिस आणि कार्यकर्ते भिडले होते.
भारतीय जनता युवा मोर्चाने शनिवारी रांचीमध्ये मोर्चा काढला होता. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेड्स लावले होते. पण कार्यकर्त्यांनी ते तोडल्याने पोलिस आणि त्यांच्यामध्ये झटापट झाली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष बाबूलाल मरांडी, विरोधी पक्षनेते अमर कुमार बाऊरी, केंद्रीय मंत्री संजय सेठ, माजी केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांच्यासह भाजपचे सुमारे 50 पदाधिकारी आणि 12 हजारांहून अधिक अज्ञातांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याविरोधात लवकरच कारवाई केली जाणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिक्षक चंदन कुमार सिन्हा यांनी सांगितले.
दरम्यान, पोलिसांनी कार्यकर्त्यांवर रबराच्या गोळ्या चालवल्या, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, पाण्याचे फवारे सोडले, असे आरोप भाजपकडून करण्यात आले आहे. यामध्ये अनेक कार्यकर्ते जखमी झाल्याचा दावाही करण्यात आला आहे. पोलिसांनीही कार्यकर्त्यांमुळे काही कर्मचारी जखमी झाल्याचा दावा केला आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेतील कलम 163 लागू केले होते. या कालावधीत शुक्रवारी सकाळी 11 ते रात्री 11 दरम्यान सार्वजनिक बैठका, रॅली, आंदोलन आणि पाचहून अधिक लोकांनी एकत्रित येण्यास बंधने घालण्यात आली होती. पण त्यानंतरही भाजप कार्यकर्त्यांकडून मोर्चा काढण्यात आला होता.
झारखंडमध्ये नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या इंडिया आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे भाजपकडून सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली जात आहे. सरकारमधील भ्रष्टाचार, गुन्हेगारी, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावरील आरोप आदी मुद्दे घेऊन भाजपने आघाडीला घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.