

PM Modi: दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानात सुरु असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देताना लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी काँग्रेसच्या अनेक खासदारसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केलं. यावेळी या खासदारांनी आंदोलनस्थळी पंतप्रधानांसह सरकारविरोधात घोषणाबाजी सुरु केली.
मोठ्या प्रमाणावर इथं पोलिसांचा फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे. यावेळी काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना पोलिसांच्या गाडीतून घेऊन गेले. तर दुसरीकडं ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी जंतरमंतरवर जाऊन अभिजीत दिपकेंसह आंदोलकांची भेट घेतली.
नवी दिल्लीतील लोककल्याण मार्ग येथील निवासस्थानाबाहेर राहुल गांधी यांच्यासह, प्रियांका गांधी, केसी वेणुगोपाल यांच्यासह १२० विरोधी खासदारांनी हजेरी लावली आहे. यावेळी या खासदारांनी ठिय्या मारत मोठ्यानं घोषणाबाजी केली. यावेळी कालच्या सीजेपीच्या आंदोलनात झालेल्या तरुणांवरील लाठीचार्जविरोधात आवाज उठवत यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच केंद्रीय शिक्षण मंत्री धरेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. यावेळी पंजाब काँग्रेस प्रचार समितीचे प्रमुख चरणजीतसिंह चन्नी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तसंच सरकारच्या दडपशाहीवर बोलताना सरकार विद्यार्थ्यांचं ऐकून घेत नाहीत हा भाजपचा दहशतवाद असल्याचं म्हटलं आहे.
पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर जमलेल्या खासदारांनी आपल्या हातात प्रतिकात्मक बेड्या घालून पंतप्रधानांचा तसंच सरकारचा निषेध नोंदवला. यावेळी काँग्रेसचे खासदार के सुरेश यांनी म्हटलं की, "आम्ही पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करत आहोत कारण काल आपल्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी अत्यंत अमानुषपणे हल्ला केला. यावर पंतप्रधान एकही शब्द अद्याप बोललेले नाहीत, तसंच गृहमंत्र्यांनी देखील अद्याप एकही प्रतिक्रिया दिलेली नाही. पंतप्रधान विद्यार्थ्यांच्या या प्रश्नावर तोंड उघडायला तयार नाहीत"
दरम्यान, दुसरीकडं जंतर-मंतरवर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासह पोहोचले. यावेळी त्यांनी अभिजीत दिपके यांची भेटही घेतली. यावेळी शरद पवार म्हणाले, नीट (NEET) परीक्षेतील पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी दिल्लीमधील जंतरमंतर येथे उपोषण आणि आंदोलन केले आहे. काल आपल्या न्याय्य मागणीसाठी लढा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी जी वागणूक दिली, ती लोकशाही मूल्यांना न शोभणारी आहे. आज आंदोलनस्थळी जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली, आंदोलनादरम्यान जखमी झालेल्यांची विचारपूस केली, तसेच त्यांच्या मागण्या सविस्तर जाणून घेतल्या.
देशातील प्रत्येक नागरिकाच्या हक्कांना आणि अधिकारांना भारतीय संविधानाने संरक्षण दिले असून सरकार आणि प्रशासन जनतेला उत्तरदायी आहे. त्यामुळे आपल्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर व नागरिकांवर दडपशाही करण्यापेक्षा सरकारने त्यांच्या मागण्याचा संवेदनशीलपणे विचार करावा तसेच त्यांच्या मागण्यांची दखल घेत योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणीही यावेळी शरद पवार यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.