US Presidential Election : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार व माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड टॅम्प यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत त्यांच्या विरोधक डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांना पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, आता अमेरिकेत वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.
कमला हॅरिस यांचे माजी सल्लागार जमाल सिमन्स यांनी जो बायडेन यांच्याकडे मोठी मागणी केली आहे. बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा देऊन कमला हॅरिस यांना देशाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनवावे, असा आग्रह सिमन्स यांनी केला आहे.
निवडणुकीतील पराभवामुळे कमला हॅरिस यांचे समर्थक निराश झाले आहेत. सिमन्स हेही हॅरिस यांच्या प्रचारात सक्रीय होते. रविवार एका टॉक शोमध्ये सिमन्स यांनी पुन्हा कमला हॅरिस यांच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी आपली भूमिका मांडली.
जो बायडेन यांचे काम अद्भूत राहिले आहे. पण त्यांनी आता त्यांचे शेवटचे आश्वासन पूर्ण करावे. सध्याची स्थिती पाहता आता बदलासाठी त्यांनी एक पाऊल पुढे टाकायला हवे. बायडेन पुढील 30 दिवसांत राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा देऊ शकात. त्यानंतर कमला हॅरिस यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष बनवू शकतात, असे सिमन्स यांनी म्हटले आहे.
जो बायडेन यांच्या नियंत्रणात ही गोष्ट आहे. त्यांनी असे केले तर त्यांनी दिलेले शेवटचे आश्वासनही पूर्ण होईल. त्यांचा हा निर्णय कमला हॅरिस यांना अमेरिकेच्या 47 व्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होण्याची संधी देईल. यामुळे डोनाल्ड टॅम्प यांच्यासमोर अडचणी निर्माण होतील. त्यांना पुन्हा प्रत्येक गोष्टीसाठी ब्रँडिंग करावे लागेल, असे सिमन्स यांनी म्हटले आहे.
कमला हॅरिस या सध्या उपाध्यक्ष आहेत. निवडणुकीत निवडून आलेले डोनाल्ड ट्रम्प 20 जानेवारी 2025 रोजी 47 व्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतील. पण सिमन्स यांच्या आग्रहाप्रमाणे जर बायडेन यांनी राजीनामा देऊन कमाल हॅरिस यांना काही काळापुरती संधी दिली तर ही मोठी ऐतिहासिक घडामोड ठरू शकते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.