New Delhi : हरियाणामध्ये पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली असली तरी नेत्यांमधील वादाने डोकेदुखी वाढवली आहे. राज्यात काँग्रेसचा दलित चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खासदार कुमारी शैलजा मागील काही दिवसांपासून प्रचारापासून दूर आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत नेत्यांमधील नाराजी समोर आल्याने भाजपकडूनही त्याचे भांडवल केले जाऊ लागले आहे.
निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी कुमारी शैलजा यांनी राज्यभरात यात्रा काढली होती. त्यांच्या समर्थकांच्या प्रचारातही त्या सक्रीय होत्या. पण जवळपास सर्व जागांवर उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्यांनी अचानक प्रचारातून अंग काढून घेतल्याचे दिसत आहे. सुरूवातीला मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या कुमारी शैलजा यांच्या या भूमिकेमुळे पक्षात घमासान सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कुमारी शैलजा यांच्या नाराजीचे कारण उमेदवारांची निवड असल्याचे समजते. माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुडा यांच्या गटातील नेत्यांनाच अधिक तिकीटे देण्यात आल्याने त्या नाराज आहेत. तसेच राज्यातील प्रचारातही पक्षाच्या पोस्टरवरून त्यांचे फोटो गायब झाल्याचे दिसून आले. हुडा हे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षही असल्याने राज्यात त्यांच्याच इशाऱ्यावर प्रचार सुरू असल्याचे दावा शैलजा कुमारी यांच्या गटाकडून केला जात आहे.
हरियाणातील प्रचार सोडून कुमारी शैलजा सध्य दिल्लीत असल्याच समजते. सोशल मीडियातही त्या फारशा सक्रीय नाहीत. हरियाणातील निवडणुकीबाबत मागील दहा नऊ दिवसांत त्यांच्या केवळ दोन-तीन पोस्ट आहेत. त्यांच्या या नाराजीचा फटका काँग्रेसला निवडणुकीत बसू शकतो.
भाजपने कुमारी शैलजा यांच्या नाराजीचे भांडवल करण्यास सुरूवात केली आहे. काँग्रेसमध्ये त्यांना दूर लोटले जात असल्याची टीका भाजपने केली आहे. शैलजा या दलित समाजातील असल्याने त्यांना डावलले जात असल्याचे भाजपने म्हटले आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री नायब सिंह सैनी म्हणाले, ‘हुडा हे दलितविरोधी असल्याने शैलजा यांचे असे हाल झाले आहेत.’ काँग्रेसमधील काही ताकदवान लोक दलित मुलगी असलेल्या शैलजा यांना पुढे जाऊ दिले जात नसल्याची टीका माजी मंत्री मनीष ग्रोवर यांनी केली आहे.
हरियाणामध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना शैलजा कुमारी दिल्लीत आहेत. मागील आठ दिवसांपासून त्या सक्रीय नाहीत. असे असूनही पक्ष नेतृत्वाकडून त्याची दखल घेतली जात नसल्याची चर्चा आहे. शैलजा या राज्यातील महत्वाच्या नेत्यांपैकी एक आहेत. पण त्यांना प्रचारात सक्रीय करण्यात नेतृत्वाला अपयश येत असल्याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.