Haryana Election : एक खुर्ची, चार नेते! काँग्रेस कुणाच्या गळ्यात टाकणार मुख्यमंत्रिपदाची माळ, कुणाचं पारडं जड?

Congress Politics Assembly Elections 2024 Bhupinder singh Hooda Kumari Selja : एक्झिट पोलनुसार हरियाणात काँग्रेस बहुमताचा आकडा पार करू शकते.
Haryana Congress
Haryana CongressSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजप हॅटट्रिकपासून दूर राहू शकते, असे चित्र सुरूवातीपासूनच होते. एक्झिट पोलमध्येही त्यावर शिक्कामोर्तब झाले. काँग्रेस बहुमताचा आकडा पार करून राज्यात दहा वर्षांनंतर पुन्हा सत्तेत येईल, असा अंदाज पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. अर्थात हा अंदाज असून प्रत्यक्ष निकालानंतरच चित्र स्पष्ट होईल. पण त्याआधीच राज्यात मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे.

विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधीपासूनच काँग्रेसमधील बड्या नेत्यांमध्ये मुख्यमंत्रिपदावरून ठिणग्या पडण्यास सुरूवात झाली होती. माजी मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष भूपिंदर सिंह हुडा आणि खासदार कुमारी सैलजा त्यामध्ये आघाडीवर होत्या. हे दोघेच मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार मानले जात आहेत.

Haryana Congress
Jammu-Kashmir Assembly Election : भाजप बहुमतापासून दूर, पण सत्तेच्या जवळ; हरियाणाची पुनरावृत्ती होणार?

कुमारी सैलजा यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हुडा यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेत सुरूवातीला प्रचारातून माघार घेत आपली नाराजी दाखवून दिली. मतदान झाल्यानंतरही त्यांनी भजनलाल यांच्या नेतृत्वाखाली निवडणुक लढवलेली असताना हुडा मुख्यमंत्री होऊ शकतात, असे सांगत काँग्रेसच्या जुन्या निर्णयाची आठवण करून दिली.

काँग्रेसने नुकतीच पार पडलेली निवडणूक हुडा यांच्या नेतृत्वाखाली लढवली असली तरी निकालानंतर काहीही होऊ शकते, असेच सैलजा यांना सुचवायचे आहे. या दोन बड्या नेत्यांव्यतिरिक्त भूपिंदर हुडा यांचे खासदार पुत्र दिपेंदर हुडाही या रेसमध्ये आहे. ते राहुल गांधी यांचे निकटवर्ती मानले जातात. त्यांचे समर्थकही कामाला लागले आहेत. तर दिल्लीत वजन असलेले रणदीप सुरजेवाला यांनीही मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Haryana Congress
Exit Poll : हरियाणा, जम्मू आणि काश्मीर निवडणुकीत काँग्रेसचं जोरदार कमबॅक, भाजपला धक्का; 'एक्झिट पोल'ची आकडेवारी काय सांगते ?

हुडा-सैलजांमध्ये टक्कर

हुडा पिता-पुत्र, कुमारी सैलजा आणि सुरजेवाला या चार नेत्यांमध्ये खरी टक्कर असेल ती भूपिंदर हुडा आणि सैलजा यांच्यातच. हुडा हे दोनदा मुख्यमंत्री राहिले आहेत. यावेळीही त्यांनी सत्ता काबीज करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली आहे. हुडा पिता-पुत्राने राज्यभर दौरे करत काँग्रेसच्या बाजूने वातावरणनिर्मिती करण्यात कसलीच कसर सोडली नाही. त्यामुळे हुडांचा दावा मजबूत असल्याचे मानले जाते.

हुडा यांना सैलजा यांचे आव्हान असल्याचीही जोरदार चर्चा आहे. प्रचारातून माघार देत त्यांनी तसे दाखवूनही दिले होते. दलित समाजातील सैलजा राज्यातील मोठा चेहरा आहेत. पहिल्या दलित महिला मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. याचा चांगला मेसेज संपूर्ण देशात जाईल, अशीही काहींची भावना आहे. सैलजा यांचे गांधी कुटुंबाशी जवळचे नाते आहे.

... हुडांचे पारडे जड

तिकीट वाटपामध्ये हुडा यांच्या समर्थकांना झुकते माप देण्यात आले होते. त्यामुळेच सैलजा नाराज झाल्या होत्या. निकालानंतर आमदारांची मते जाणून घेत नेता निवडण्याचा निर्णय झाल्यास हुडा यांच्या पारड्यात सर्वाधिक आमदारांची मते पडू शकतात. त्यांची मते डावलून इतर नेत्याला मुख्यमंत्री करण्यात काँग्रेसश्रेष्ठी मान्यता देणार का, याबाबत साशंकता आहे. कारण कोणत्याही आमदार किंवा नेत्यांची नाराजी काँग्रेसला परवडणारी नाही. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी अधिकाधिक नेते-आमदारांना खूष ठेवण्याची कसरत हायकमांडला करावी लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com