

India international relations news : अमेरिका व इस्त्राईलच्या हल्ल्यात पाच दिवसांपूर्वी इराणचे माजी सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर जगभरात या घटनेचे पडसाद उमटले. रशियासह काही देशांनी ही हत्या असल्याचे सांगत हल्ल्याचा निषेध केला. तर काही देशांनी त्याच उघडपणे समर्थन केले. पण भारताकडून खामेनेई यांच्या मृत्यूवर अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नव्हती.
इराणविरोधात अमेरिका व इस्त्राईलने युध्द सुरू केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराण वगळता इस्त्राईलसह आखातातील काही देशांच्या प्रमुखांसी दुरध्वनीवरून संवाद साधला होता. यादरम्यान त्यांनी शांततेवर भर देत भारतीय नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, खामेनेई यांच्या मृत्यूबाबत मोदींसह परराष्ट्र मंत्रालयाकडूनही कोणतीही अधिकृत भूमिका घेण्यात आली नव्हती.
अखेर गुरूवारी पाच दिवसांनंतर भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी नवी दिल्लीतील इराणी दूतावास गाठले. याठिकाणी मिसरी यांनी शोकपुस्तिकेवर स्वाक्षरी करत खामेनेई यांच्या मृत्यूबाबत संवेदना व्यक्त केल्या. त्याचप्रमाणे इराणविषयी एकजुटतेची भावना व्यक्त करण्यात आली. खामेनेई हे १९८९ पासून इराणचे सर्वोच्च नेते होते.
दरम्यान, खामेनेई यांचा २८ फेब्रुवारीला अमेरिका व इस्त्राईलच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. या घटनेमुळे चवताळलेल्या इराणने तोडीस तोड प्रत्युत्तर दिले. त्यामुळे हा संघर्ष चांगलाच भडकला असून त्यामध्ये आखातातील आठ-नऊ देशही ओढले गेले आहेत. इराणकडून या देशांमधील अमेरिकेचे हवाई तळ उद्ध्वस्त केले जात आहेत. तसेच अन्य महत्वाची ठिकाणेही उद्ध्वस्त केली जात आहेत.
अमेरिका आणि इस्त्राईलच्या संयुक्त कारवाईमध्ये खामेनेई यांच्यासह इराणचे आणखी काही प्रमुख नेते व वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. पण त्यानंतरही इराण मागे हटायला तयार नाही. याउलट गर्भित इशारा दिला जात आहे. मात्र, या संघर्षामुळे आखातातून तेल व गॅसच्या निर्यातीवर विपरीत परिणाम झाला आहे. त्याचा फटका जगातील अन्य देशांना बसू लागला आहे. त्याचप्रमाणे या देशांमधील आयातही थांबली असून भारतालाही त्याची झळ सोसावी लागत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.