
Pahalgam attack response : भारतीय हवाई दलाच्या राफेल विमानांनी आज पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या माध्यमातून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. या ऑपरेशनची संपूर्ण माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली. ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्याची जबाबदारी भारतीय लष्कराने दोन महिला अधिकाऱ्यांवर सोपवली होती. त्यांनी ऑपरेशनसाठी संबंधित ठिकाणांचीच निवड का केली, त्याचे व्हिडीओही दाखविले.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने कांगावा सुरू केला आहे. भारताने लष्कराने सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य केल्याचा आरोप पाकिस्तानकडून केला जात आहे. हे आरोप पत्रकार परिषदेत फेटाळून लावण्यात आले. ऑपरेशन सिंदूरमध्ये कोणत्याही सैन्य ठिकाणांवर हल्ला करण्यात आलेला नाही. तसेच जीवितहानी झाल्याची एकही घटना घडलेली नसल्याचेही पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले.
भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरवर भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांच्यासह भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंह आणि भारतीय लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी यांनी माहिती दिली. यावेळी बोलताना मिस्त्री यांनी पाकिस्तानला उघडं पाडलं. तसेच पत्रकार परिषदेच्या सुरूवातीलाच एक व्हिडीओ दाखविण्यात आला.
व्हिडिओमध्ये 2001 मध्ये ससंदेवर झालेला दहशतवादी हल्ला ते 2008 मध्ये मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याची हृदय पिळवटून टाकणारी दृश्य दाखविण्यात आली. तसेच उरी, पुलवामा हल्ल्याची दृश्य दाखविण्यात आला. आता आणखी नाही, असे व्हिडीओ शेवटी दाखवत दहशतवाद्यांसह पाकिस्तानलाही इशारा देण्यात आला.
सोफिया कुरेशी यांनी सांगितले की, रात्री 1.05 ते 1.30 वाजेपर्यंतच्या कालावधीत ऑपरेशन सिंदूर पूर्ण करण्यात आले. पहलगाममध्ये 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेले निष्पाप नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी हे ऑपरेशन राबविण्यात आले. एकूण नऊ दहशतवादी तळांना लक्ष्य करून ती पूर्णपणे उध्वस्त करण्यात आली.
पाकिस्तानात मागील तीन दशकांपासून दहशतवादाला खतपाणी घातले जात आहे. यामध्ये दहशतवाद्यांची भरती, त्यांना प्रशिक्षण, लाँच पॅडही होते. ही दहशतवादी ठिकाणे पाकिस्तानसह पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमध्ये आहेत. या ठिकाणांची निवड विश्वसनीय गुप्तचर माहितीच्या आधारे करण्यात आली. जेणेकरून दहशतवाद्यांचे कंबरडे मोडता येईल. सामान्य नागरिकांना काहीही नुकसान होणार नाही, याकडे विशेष लक्ष देण्यात आल्याचे सोफिया कुरेशी यांनी सांगितले.
ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानातील मुजफ्फराबाद येथील लष्कर-ए-तोयबाच्या प्रशिक्षण तळासह उत्तर पाकिस्तानातील सवाई आणि दक्षिणेतील बहावलपूर येथील दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रांना भारतीय लष्कराने लक्ष्य केले. बरनाला कॅम्प, सियालकोट येथील महमूना कॅम्पही या कारवाईत नष्ट करण्यात आला आहे.
भारताने उद्धव केलेल्या नऊ दहशतवादी तळांमध्ये बहावलपूर, मुरीदके, गुलपूर, भिंबर, चाक अमरू, बाग, कोटलली, सियालकोट आणि मुजफ्फराबाद येथील ठिकाणांचा समावेश असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. या ठिकाणांची दृश्य आणि हल्ल्याचे वेळचे व्हिडीओ फुटेजही यावेळी दाखविण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.