

भारत आणि अमेरिका यांच्यात जाहीर झालेल्या अंतरिम व्यापार करारानंतर एक महत्त्वाचा बदल समोर आला आहे. व्हाइट हाऊसने जाहीर केलेल्या अधिकृत फॅक्ट शीटमध्ये अवघ्या एका दिवसात शब्दरचना आणि काही अटींमध्ये बदल करण्यात आले. विशेष म्हणजे, 500 अब्ज डॉलरच्या खरेदीबाबत वापरलेली भाषा मवाळ करण्यात आली आहे. यामुळे कराराच्या काही मुद्द्यांबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
मंगळवारी व्हाइट हाऊसकडून प्रसिद्ध झालेल्या पहिल्या फॅक्ट शीटनुसार, भारताने अमेरिकेकडून 500 अब्ज डॉलरहून अधिक किमतीची ऊर्जा उत्पादने, माहिती व दळणवळण तंत्रज्ञानाशी संबंधित साधने, कृषी उत्पादने, कोळसा आणि इतर वस्तू खरेदी करण्याचे “कमिटमेंट” दिल्याचे नमूद होते. तसेच भारत अमेरिकेतील सर्व औद्योगिक वस्तूंवरील आणि अनेक अन्न व कृषी उत्पादनांवरील आयात शुल्क रद्द करेल किंवा कमी करेल, असे स्पष्टपणे लिहिले होते.
मात्र, व्हाइट हाऊसच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेल्या नव्या आवृत्तीत “कमिटमेंट” ऐवजी “खरेदी करण्याचा इरादा” असा शब्दप्रयोग करण्यात आला आहे. यामुळे भारतावर असलेली बंधनकारक जबाबदारी काहीशी सैल झाल्याचे मानले जात आहे. याशिवाय, उत्पादनांच्या यादीतून “कृषी” हा शब्दही वगळण्यात आला आहे.
पहिल्या दस्तावेजात अमेरिकन औद्योगिक वस्तूंव्यतिरिक्त सुक्या डिस्टिलर्स ग्रेन्स, पशुखाद्यासाठी रेड ज्वारी, ड्राय फ्रूट्स, ताजी व प्रक्रिया केलेली फळे, काही कडधान्ये, सोयाबीन तेल, वाइन आणि स्पिरिट्स यांसारख्या वस्तूंवरील शुल्क कमी किंवा रद्द केले जाईल, असे नमूद होते. नव्या आवृत्तीत “काही कडधान्ये” हा उल्लेख काढून टाकण्यात आला आहे. या बदलामुळे कृषी क्षेत्राशी संबंधित संवेदनशील मुद्द्यांवर भारताने आपली भूमिका स्पष्ट ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे संकेत मिळत आहेत.
गेल्या आठवड्यात दोन्ही देशांनी अंतरिम व्यापार कराराचा आराखडा जाहीर केला. त्यानुसार, अमेरिका भारतीय वस्तूंवरील आयात शुल्क ५० टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत कमी करणार आहे. त्याबदल्यात भारत अमेरिकेतील औद्योगिक वस्तूंवरील तसेच काही अन्न व कृषी उत्पादनांवरील कर कमी करणार आहे. यामध्ये डिस्टिलर्स ग्रेन्स, रेड ज्वारी, ड्राय फ्रूट्स, ताजी व प्रक्रिया केलेली फळे, सोयाबीन तेल, वाइन आणि स्पिरिट्स यांचा समावेश आहे.
करारानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेला अतिरिक्त २५ टक्के आयात शुल्कही हटवला आहे. हा कर भारताने रशियाकडून तेल खरेदी केल्याच्या पार्श्वभूमीवर ऑगस्टमध्ये लावण्यात आला होता. ट्रम्प यांनी भारताने या संदर्भात महत्त्वपूर्ण पावले उचलल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, अंतिम व्यापार करारावर स्वाक्षरी करण्यासाठी नवी दिल्ली आणि वॉशिंग्टन यांच्यातील चर्चा अंतिम टप्प्यात असून, मार्चच्या मध्यापर्यंत अंतिम करारावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर फॅक्ट शीटमधील बदलांकडे दोन्ही देशांच्या राजकीय आणि आर्थिक वर्तुळांचे बारकाईने लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.