New Delhi : जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सने काँग्रेसला सोबत घेत राज्यात पुन्हा सत्ता काबीज केली. इंडिया आघाडीसाठी हा विजय अनेक अर्थांनी महत्वाचा असला तरी सत्तेत गेलेल्या काँग्रेसला त्याचा विसर पडल्याचे दिसते. एका राज्यात सत्तेत येऊनही काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची काहीच प्रतिक्रिया आलेली नाही. सरचिटणीस प्रियांका गांधींनीही हा विजय सेलिब्रेट केलेला नाही.
लोकसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर राहुल गांधींसह प्रियांका व इतर सर्वच नेत्यांनी जणू जल्लोष केला होता. एनडीएची सत्ता येऊनही केवळ काँग्रेसच्या जागांमध्ये अनपेक्षित वाढ राहुल यांच्यासाठीही सुखद धक्का देणारी होती. त्यामुळे भारतातील मतदारांनी लोकशाहीचे रक्षण केल्याचे सांगताना राहुल यांना झालेला आनंद स्पष्ट दिसत होता.
असा आनंद मात्र जम्मू आणि काश्मीरमध्ये सत्ता मिळाल्यानंतर झालेला दिसत नाही. सोशल मीडियात राहुल यांनी निवडणुकीच्या निकालाबाबत एक शब्दही लिहिलेला नाही. काँग्रेसमधील हे शांततात खूप काही सांगून जाते. या शांततेचे प्रमुख कारण आहे, हरियाणातील धक्कादायक पराभव. हा पराभव राहुल यांच्याही चांगलाच जिव्हारी लागलेला दिसतो. या पराभवाखाली काश्मीरमधील विजयही दबून गेला. त्यामुळेच जीतकर भी हारने वालों को काँग्रेस कहते है, असे म्हणायला हरकत नाही.
हरियाणामध्ये काँग्रेसची सत्ता येणार असे एक्झिट पोलचे अंदाज होते. सुरूवातीच्या फेऱ्यांमध्ये तसे कलही हाती येत होते. पण अचानक चित्र बदलले आणि बघता-बघता भाजपने सत्ता मिळवली. खरेतर निवडणुकीच्या प्रचारातही काँग्रेस नेते विजयाच्या अविर्भावात होते. तसे रिपोर्ट राहुल यांच्यापर्यंत पोहचत होते. जमिनीवर स्थितीही तशीच होती. शेतकऱ्यांमधील नाराजी, बेरोजगारी असे मुद्दे भाजपचा पराभव करतील, असे दिसत होते. पण अतिआत्मविश्वास काँग्रेसला नडला. त्यातच अंतर्गत कलहाने भर घातली.
प्रचारदरम्यान मुख्यमंत्रिपदावरून नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू होती. उमेदवार निवडीतील नाराजी आणि प्रदेश पातळीवर डावलले जात असल्याने कुमारी शैलजा जवळपास दहा दिवस प्रचारापासून दूर होता. भूपिंदर सिंह हुडा आणि त्यांच्यातील शीतयुध्द शेवटपर्यंत पाहायला मिळाले. पण सत्ता मिळवण्याच्या धडपडीत या गोष्टींकडे दुर्लक्ष झाले. भाजपने शिस्तबध्दपणे याचा प्रचारही केला. पण राहुल प्रचाराच्या स्क्रीप्टमधून बाहेर गेलेच नाहीत. ते निकालाच्या दिवसापर्यंत विजय आपलाच, या आशेवर होते. त्यामुळे हरियाणातील निकाल त्यांच्यासाठी अनपेक्षित ठरला आहे.
दुसरीकडे जम्मू आणि काश्मीरमध्ये काँग्रेस सत्तेत जाणार असले तरी पक्षाला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी पक्षाच्या जागा चारने कमी झाल्या आहेत. यावेळी केवळ सहा जागाच मिळाल्या असून एकट्या नॅशनल कॉन्फरन्सने ४२ जागा जिंकल्या आहेत. दोन्ही पक्षांतील आघाडीचा फायदा फारुख अब्दुल्ला यांच्याच पक्षाला झाला. भाजपशी थेट लढत असलेल्या बहुतेक जागांवर काँग्रेसचा पराभव झाला आहे. त्यामुळे सत्तेत येऊनही विजयाचा आनंद साजरा होताना दिसत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.