रांची : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांची आज (गुरुवार १७ नोव्हें) राजधानी रांची ईडीच्या झोन कार्यालयात चौकशी होणार आहे. ईडीच्या मुख्यालयातून सहसंचालकांसह तीन अधिकाऱ्यांचे पथक चौकशीसाठी रांचीला पोहोचले आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या चौकशीसाठी ईडीने 200 हून अधिक प्रश्नांची यादी तयार केली आहे.
ईडीने याआधी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ३ नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी बोलावले होते, मात्र त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तीन आठवड्यांचा वेळ मागितला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना पुन्हा समन्स बजावून १७ नोव्हेंबरला हजर राहण्यास सांगण्यात आले. हेमंत सोरेन यांच्या चौकशीदरम्यान ईडी कार्यालयातही पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. यासाठी तपास यंत्रणेने झारखंड पोलीस आणि सीआरपीएफला आधीच पत्र लिहिले आहे.
पंकज मिश्रा, प्रेम प्रकाश संबंधित प्रश्नांची शक्यता :
प्राप्त माहितीनुसार, सोरेन यांच्या चौकशीदरम्यान पंकज मिश्रा, प्रेम प्रकाश आणि कोलकाता येथील व्यावसायिक अमित अग्रवाल यांच्याशी संबंधित प्रश्नही असू शकतात. कारागृहात असताना पंकज मिश्रा यांच्याकडून मोबाईल वापरण्याबाबत प्रश्नोत्तरे होऊ शकतात, अशी माहिती आहे.
ईडीचे 3 अधिकारी रांचीला पोहोचले :
मुख्यमंत्र्यांच्या चौकशीसाठी ईडीच्या तीन अधिकाऱ्यांचे पथक बुधवारी रांचीला पोहोचले आहे. यामध्ये तपास यंत्रणेचे सहसंचालक, सहायक संचालक आणि उपसंचालक स्तरावरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. चौकशीदरम्यान व्हिडिओग्राफीही केली जाणार आहे.
हेमंत यांना उत्तराधिकारी ठरवण्याचा अधिकार दिला :
आज होणारी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची ईडीची चौकशी पाहता, आघाडी सरकारने प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयारी केली आहे. त्यासाठी रणनीती आखण्यात आली आहे. आघाडी विधिमंडळ पक्षाने मुख्यमंत्र्यांना कोणत्याही परिस्थितीत निर्णय घेण्याचे आणि उत्तराधिकारी ठरवण्याचे अधिकार दिले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या महाआघाडीच्या बैठकीत हा करार करण्यात आला. हेमंत सोरेन पत्नी कल्पना सोरेन यांना उत्तराधिकारी म्हणून घोषित करू शकतात, अशीही चर्चा आहे.
संसदीय कामकाज मंत्री व काँग्रेसचे नेते आलमगीर आलम म्हणाले की, आघाडी हेमंत सोरेन यांच्यासोबत आहे. दुसरीकडे, झारखंड मुक्ती मोर्चा केंद्रीय समितीचे सदस्य विनोद कुमार पांडे म्हणाले की, पक्षाच्या बैठकीमध्ये कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे. ईडीच्या चौकशीपूर्वी बुधवारी मुख्यमंत्री हेमंत सोरेन आपल्या निवासस्थानी झामुमोच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले की, तुम्ही आमच्यासोबत असाल तर सरकार हटवण्याचा कट यशस्वी होणार नाही.
सरकार हटवण्याचे षडयंत्र यशस्वी होऊ देणार नाही : मुख्यमंत्री
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, झारखंडमधील सरकार तेच चालवू शकतात जे आदिवासी आणि स्थानिकांच्या भावना जाणतात आणि झामुमोला हे माहित आहे. सरकार हटवण्याच्या हा कट यशस्वी होऊ देणार नाही. विरोधक सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, पण तुम्ही ठाम राहिल्यास हा डावही यशस्वी होणार नाही.
अनेक नेते झामुमोमध्ये सामील झाले :
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप आणि इतर पक्षांच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या निवासस्थानी जेएमएममध्ये प्रवेश केला. यामध्ये माजी आमदार व भाजप नेते जयप्रकाश वर्मा यांचाही समावेश आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही लढून हे राज्य मिळवले, मात्र राज्याच्या निर्मितीनंतर दुर्दैवाने वीस वर्षे सत्तेची कमान अशा लोकांच्या हाती राहिली ज्यांचा आदिवासी-मूळनिवासींशी काहीही संबंध नाही. आदिवासी, मूलनिवासी आणि दलितांना बळ द्यायचे आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.