US Presidential Election 2024 Update : अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणुकीशी संबंधित मोठी घडामोड घडली आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आगामी राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. बायडेन यांनी या निवडणुकीच्या शर्यतीमधून माघार घेत आपलं नाव मागे घेतले आहे. त्यामुळे आता ते ही निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. बायडेन यांनी स्वत: या वृत्ताला दुजोराही दिला आहे.
विशेष म्हणजे हा निर्णय घेण्यामागचं कारण, बायडेन(Joe Biden) यांनी स्वत:च स्पष्ट केलं आहे. त्यांनी सांगितलं आहे की, अमेरिका आणि पक्षाच्या हितासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. ते लवकरच देशाला संबोधित करतील आणि आपल्या निर्णयाबाबत सविस्तरपणे बोलतील.
बायडेन यांनी म्हटले की 'मी नामांकन न स्वीकारण्याचा आणि माझ्या उर्वरीत कार्यकाळासाठी राष्ट्राध्यक्ष म्हणून माझ्या कर्तव्यावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. 2020मध्ये राष्ट्रीय अध्यक्षाच्या रुपात माझा पहिला निर्णय कमला हॅरिस यांना उपराष्ट्राध्यक्ष करणं होता आणि हा माझा आतापर्यंतचा सर्वाच चांगला निर्णय ठरला आहे. आज मी कमला यांना या वर्षी आमच्या पार्टीच्या उमेदवार बनवण्यासाठी माझं संपूर्ण समर्थन आणि पाठिंबा देऊ इच्छितो. आता एकत्र येण्याची आणि ट्रम्प यांना पराभूत करण्याची वेळ आली आहे.'
मागील काही दिवसांपासून याबाबत चर्चा सुरू होती की बायडेन निवडणूक लढवणार आहेत की नाही?, यावरून अनेक अंदाजही वर्तवले जात होते. त्यांच्या आरोग्याच्या समस्यांशी संबंधितही चर्चा सुरू होत्या. प्रकृती अस्वस्थामुळे ते कदाचित निवडणूक लढवणार नाहीत, असाही अंदाज वर्तवला जात होता आणि अखेर रविवारी बायडेन यांनी स्वत:च आपण आगामी निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं. त्यामुळे आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
बायडेन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या शर्यतामधून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा तेव्हा सुरू झाल्या, जेव्हा काही दिवसांपूर्वी ते लाईव्ह चर्चेत ट्रम्प यांच्याकडून काहीसे पिछाडीवर पडताना दिसून आले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन आणि डेमोक्रेटिक पक्षांच्या वतीने राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प(Donald Trump) आणि जो बायडेन यांच्या पहिली लाईव्ह चर्चा झाली होती. ज्यामध्ये ट्रम्प हे बायडेन यांच्यावर वरचढ झाल्याचे दिसून आले होते. त्यामुळे अमेरिकेतील राजकीय वर्तुळ आणि मीडिया तसेच सर्वसामान्यांमध्ये बायडेन बाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. बायडेन यांनी या निवडणुकीतून माघार घ्यावी असंह बोललं जात होतं.
शिवाय ट्रम्प यांच्यावरील गोळीबाराच्या घटनेनंतर त्यांच्याविषयी सहानुभूती वाढल्याची चर्चा असल्याने, त्याचीही धास्ती डेमोक्रेटिक पक्षाने घेतल्याचे दिसून आले आहे. प्रामुख्याने माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, नॅन्सी पेलोसी या नेत्यांनी बायडेन यांच्या नावावर फुली मारली होती.
त्यातच बायडेन यांना कोरोना संसर्ग झाला असल्याने ते सध्या घरीच आराम करत आहेत. ते 81 वर्षांचे असून त्यांचेही वयही त्यांना साथ देत नाही. त्यामुळे बायडेन यांनी स्वत:हून निवडणुकीत माघार घ्यावी, अशी मागणी पक्षातील काही नेते करू लागले होते.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.