Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी राजकीय पक्ष कामाला लागले आहेत.
दक्षिण भारतातील या प्रमुख राज्यातील या निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले आहे. येथे एकाच टप्यात मतदान होणार आहे. 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दक्षिणेकडील राज्यात विकासाच्या खेळपट्टीवर भारतीय जनता पक्ष उभा आहे.
दक्षिणेतील एकमेव भगव्या बालेकिल्ल्यात 'डबल इंजिन' सरकार सुरू ठेवण्याचे आवाहन ते करत आहेत. भाजपकडे सध्या 119 जागा आहेत, तर काँग्रेसकडे 75 जागा आहेत. जेडीएसकडे 28 आमदार आहेत, तर दोन जागा रिक्त आहेत.
कोणत्या मुद्दांच्या आधारे मतदार मतदान करतील, याविषयी राजकीय पंडित भविष्यवाणी करीत आहेत, पण राजकारणात काहीही होऊ शकते, हे नुकत्याच निवडणुका झालेल्या राज्याच्या निकालावरुन स्पष्ट झाले आहे.
कर्नाटकात सध्या कुठल्या मुद्यांची चर्चा आहे, हे जाणून घेऊन या. या निवडणुकीत आरक्षणात वाढ, मतांचे धार्मिक आधारावर ध्रुवीकरण करण्याचा झालेला प्रयत्न हे सारे मुद्दे आहेत. त्याचा प्रभाव मतदारांवर होऊ शकतो. एबीपी-सीव्होटरच्या पाहणीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. पण भाजपला पुन्हा सत्तेत येण्याची आशा आहे.
भाजप नवीन इतिहास घडवेल ?
कुठल्याही पक्षाला सलग दुसऱ्यांदा कर्नाटकात सत्ता स्थापन करता आलेली नाही, हा गेल्या ४३ वर्षांचा इतिहास आहे. पण भाजप नवीन इतिहास घडवेल, असे भाजप नेत्यांना वाटते. १९८० नंतर कर्नाटकात सलग दुसऱ्यांदा कुठल्याही पक्षाला सत्ता स्थापन करता आलेली नाही. माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या धर्मनिरपेक्ष जनता दलामुळे कोणाचा फायदा वा तोटा होतो यावरही भाजप आणि काँग्रेसची सत्तेची सारी गणिते अवलंबून आहेत.
मोदी आणि मुख्यमंत्री बोम्मई यांची प्रतिमा
या विधानासभा निवडणुकीत मोदी यांची प्रतिमा मतदारांचा आकर्षित करण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. पण मुख्यमंत्री बोम्मई यांच्याविषयी जनतेमध्ये नाराजी आहे. निवडणुकपूर्व पाहणीत बोम्मई हे मुख्यमंत्री होतील, असे २४ हजारांपेक्षा अधिक लोकांना वाटते. तर केंद्रातील मोदी सरकारवर जनता समाधानी असल्याचे पाहणीत आढळले आहे.
भष्ट्राचार आणि प्रशासन
भष्ट्राचार आणि प्रशासन या दोन मुद्दांवर भाजपला फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सत्ताधारी भाजपवर भष्ट्राचाराचा आरोप आहे. मुख्यमंत्री हे ठेकेदारांकडून ४० टक्के घेतात, असा आरोप करीत या विरोधात विरोधकांनी अभियान सुरु केले होते, याचा परिणाम या निवडणुकीत होऊ शकते. सत्ताधारी भाजपच्या विरोधात लाट असल्याचे सी-व्होटरच्या पाहणीत आढळले आहे. बोम्मई सरकार ४० टक्के दलालीच्या आरोपांवरून चांगलेच बदनाम झाले. हा आरोप ठेकेदारांच्या संघटनेने केला. त्यानंतर एका ठेकेदाराने भाजपच्या मंत्र्यांच्या टक्केवारीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. ‘४० टक्के दलालीचे सरकार’ , ‘पे मुख्यमंत्री’ अशी पोस्टर्स काँग्रेसने राजधानी बंगळुरूमध्ये ठिकठिकाणी लावली होती.
राजकीय पक्षांची अंतर्गत धुसफूस
कर्नाटकात सर्वच पक्षात अंतर्गत गटबाजीची फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपमध्ये बीएस येदियुरप्पा यांना पक्षातील अंतर्गत गटबाजीचा फटका बसला आहे. बोम्मई हे भाजपमधून बाहेरून आलेले. यामुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांबरोबर त्यांचे सूत तेवढे जमले नाही. यामुळेच बोम्मई यांना अपशकून करण्याकरिता भाजपमधील काही मंडळी प्रयत्नशील आहेत. येडियुरप्पा यांची भूमिकाही निर्णायक असेल. त्यांचे पंख कापल्याने व मुलाला मंत्रिपद नाकारल्याने ते सुद्धा जुने हिशेब चुकते करण्याची शक्यता नाकारता येत नाही.तर काँग्रेसमध्ये सिद्धारमैया आणि डिके शिवकुमार यांच्यातील वाद जगजाहीर आहे.
धार्मिक ध्रुवीकरण
गेल्या अनेक वर्षात बीएस येदियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजप निवडणुका लढवत आहेत, ते लिंगायत समुहाचे नेते आहेत. मुस्लिमांना अल्पसंख्याक म्हणून मिळणारं 4 टक्के आरक्षणही रद्द करण्यात आले आहे. ते आरक्षण वोक्कालिंगा आणि लिंगायत समाजाला वाटून देण्यात आले आहे. त्यामुळे कर्नाटकचं समीकरण बदलले आहे. दोन्ही समाज राजकीय दृष्ट्या सजग असल्यामुळे त्याचा निवडणूकीत भाजपला फायदा होणार असल्याचा कयास लावला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.