मंत्रिमंडळातील चार रिक्त जागा भरण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी केले हात वर

कर्नाटकात मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाले असले तरी यावरुन गदारोळ सुरुच आहे. अद्याप मंत्रिमंडळातील चार जागा रिक्त आहेत.
karnataka chief minister basavraj bommai clarifies about cabinet
karnataka chief minister basavraj bommai clarifies about cabinet
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : कर्नाटकात (Karnataka) मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाले असले तरी यावरुन गदारोळ सुरुच आहे. मंत्रिपद न मिळालेले भाजप (BJP) नेते दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. यापाठोपाठ मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) हेसुद्धा दिल्लीत दाखल झाले होते. परंतु, मंत्रिमंडळातील चार रिक्त जागा भरण्याबाबत त्यांनी हात वर केले आहेत. पुढील आठवड्यात ते पुन्हा दिल्लीला जाणार आहेत. 

कर्नाटकात बी.एस.येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी बसवराज बोम्मई आले आहे. बोम्मई यांनी राज्याचा कारभार हाती घेतल्यानंतर त्यांच्यासमोरील अडचणी वाढू लागल्या आहेत. बोम्मई यांनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार हाती घेताच त्यांच्यासमोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या नेत्यांनी त्यांची डोकेदुखी वाढवली आहे. यातच खातेवाटपात महत्वाचे खाते न मिळालेले मंत्री उघडपणे नाराजी व्यक्त करीत आहेत. 

नाराज नेते दिल्लीत जाऊन बसल्यानंतर बोम्मई हेसुद्धा नुकतेच दोन दिवस दिल्लीला जाऊन आले. त्यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. बोम्मई यांनी दिल्ली दौरा हा राज्यातील विकासकामांच्या संदर्भात असल्याचे म्हटले होते. त्यांनी दिल्लीत पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांची भेट होऊ शकली नाही. अखेर दोन दिवसांनी बोम्मई हे राज्यात परतले. 

दिल्ली दौऱ्यानंतर बोलताना बोम्मई म्हणाले की, मी अमित शहांना भेटलो. राज्यातील नवे सरकार कशाप्रकारे काम करीत आहे, याची त्यांना उत्सुकता होती. राज्यातील अनेक विकासकामांबाबत त्यांच्याशी चर्चा झाली. राजकीय मुद्द्यावर मात्र, त्यांनी मला पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्याशी चर्चा करण्यास सांगितले. नड्डा यांच्याकडे मी वेळ मागितली होती परंतु, माझी भेट होऊ शकली नाही. त्यांनी मला पुढील आठवड्यात पुन्हा बोलावले आहे. अनेक नाराज नेते दिल्लीत मंत्रिपदासाठी मोर्चेबांधणी करीत आहेत. परंतु, मंत्रिमंडळातील चार रिक्त जागा कधी भरल्या जातील हे मी आताच सांगू शकत नाही. 

कर्नाटकात नुकताच मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. त्यावेळी 29 मंत्र्यांनी शपथ घेतली होती. नव्या मंत्रिमंडळात जुन्यांसोबत नव्या चेहऱ्यांनाही स्थान देण्यात आले आहे. यात अनेक नेत्यांना डावलण्यात आल्याने राजकारण तापू लागले आहे. यातील अनेक समर्थकांनी दिल्लीत जाऊन ठाण मांडले आहे. माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांचे बंधू भाजप नेते भालचंद्र जारकीहोळी, माजी मंत्री महेश कुमातळ्ळी आणि श्रीमंत पाटील हे दिल्लीत जाऊन बसले आहेत. पक्षश्रेष्ठींकडे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. यामुळे बोम्मई यांची डोकेदुखी वाढली आहे. 

येडियुरप्पांच्या रुपाने दक्षिणेत भाजपचा पहिला मुख्यमंत्री झाला होता. येडियुरप्पांची मुख्यमंत्रिपदाची ही चौथी टर्म होती. त्यांच्या चौथ्या टर्ममधील मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा केली होती. यानंतर बोम्मई यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाली होती. बोम्मई हे येडियुरप्पा यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. येडियुरप्पा यांच्या संमतीनेच त्यांची निवड झाली होती. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com