Karnataka Political News : कर्नाटकात जनता दलाने (सेक्युलर) भाजपसोबत युती केल्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. पक्षातील एका गटाला ही युती अमान्य असल्याचे समोर येऊ लागले आहे. या युतीवरून पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत माजी केंद्रीय मंत्री, जनता दलाचे माजी कर्नाटक प्रदेशाध्यक्ष सी. एम. इब्राहिम यांना निलंबित करण्यात आले आहे. जनता दलाचे सर्वेसर्वा, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी यासंदर्भात पत्र जारी केले असून, इब्राहिम यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केल्याचे या पत्रात म्हटले आहे. या युतीवरून जनता दलात फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत जनता दलाचा दारुण पराभव झाला. पक्षाचे फक्त १९ उमेदवार निवडून आले. आता अस्तित्व टिकवण्यासाठी आणि लोकसभेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून जनता दलाने भाजपसोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय मान्य नसल्याने जनता दलाच्या महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांनी नुकताच समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. या युतीचे पक्षांतर्गत पडसाद कर्नाटकमध्येही आधीपासूनच उमटू लागले आहेत.
माजी प्रेदशाध्यक्ष सी. एम. इब्राहिम यांनी या युतीच्या विरोधात उघड भूमिका घेतली आहे. तशी वक्तव्ये त्यांनी सातत्याने केली आहेत. देवेगौडा यांनी जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे, की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसोबत युती करण्याबाबात इब्राहिम यांच्याशी आधीच चर्चा झाली होती. त्या प्रक्रियेचा ते भाग होते. तरीही त्यांनी युतीबाबत सातत्याने विरोधाभासी वक्तव्ये केली आहेत. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे. (Latest Political News)
सी. एम. इब्राहिम हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते. जनता दलात प्रवेश केल्यानंतर एप्रिल २०२२ रोजी त्यांची प्रदेशाध्यपदी निवड करण्यात आली होती. एच. डी. दैवेगौडा आणि आय. के. गुजराल यांच्या सरकारमध्ये ते केंद्रीय मंत्री होते. ऑक्टोबर महिन्यात पक्षाची प्रदेश कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. इब्राहिम यांच्या जागी देवेगौडा यांनी आपले पुत्र, माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांची प्रभारी प्रदेशाध्यक्षपदी निवड केली होती.
भाजपसोबत युतीच्या निर्णयाला इब्राहिम यांनी उघडपणे विरोध सुरू केला होता. जनता दल एनडीएमध्ये सहभागी होणार नाही, असे त्यांनी जाहीर केले होते. आपलाच पक्ष खरा, असा दावा त्यांनी केला होता. त्यामुळे पक्षात फूट पडण्याचे संकेत मिळाले होते.
जनता दलाचा १६ ऑक्टोबर रोजी मेळावा आय़ोजित करण्यात आला होता. त्याचवेळी इब्राहिम यांनी समांतर मेळावा आयोजित केला होता. त्यात त्यांनी भाजपसोबतच्या युतीला विरोध दर्शवणारे वक्तव्य केले होते. सात नोव्हेंबर रोजी त्यांनी पक्षाच्या माजी पदाधिकाऱ्याना पत्र लिहून पक्षाची कार्यकारिणी बेकायदेशीर असून, ती बरखास्त केली पाहिजे, असे कळवले होते.
केरळमध्ये १५ नोव्हेंबर रोजी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या अनधिकृत बैठकीत सहभाग घेत पक्षविरोधी वक्तव्य केले होते. इब्राहिम यांच्या निलंबनासाठी पक्षाने ही तीन कारणे दिली आहेत. दरम्यान, काँग्रेसने इब्राहिम यांना विधान परिषदेवर पाठवले होते. विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देऊन त्यांनी २०२२ मध्ये जनता दलात प्रवेश केला होता.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.