Priyanka Jarkiholi: कर्नाटकातील काँग्रेसचे तरूण महिला नेतृत्व; पहिल्या आदिवासी महिला खासदार

Congress MP Priyanka Jarkiholi Chikkodi Lok Sabha Constituency in North Karnataka: निवडून आल्यानंतर प्रियांका यांनी देशाच्या संसदेत आपल्या भाषणांनी छाप उमटवली. त्या केंद्र सरकारच्या महिला रोजगार, सामाजिक न्याय समितीच्या सदस्या आहेत.
 MP Priyanka Jarkiholi
MP Priyanka JarkiholiSarkarnama
Published on
Updated on

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून चर्चेत असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी हा लोकसभेचा मतदारसंघ. सौंदत्तीचे रट्ट, बहामनी, मुघल, मराठे, ब्रिटिश आदी राज्यकर्त्यांनी या जिल्ह्यावर राज्य केल्याचा इतिहास आहे. पुणे-बंगळूरदरम्‍यानच्या राष्ट्रीय महामार्गावरील मोठे औद्योगिक, व्यापारी व शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचे असे शहर.

या जिल्‍ह्यातील चिकोडी या मतदारसंघाच्या सध्याच्या (२०२४) खासदार आहेत काँग्रेसच्या प्रियांका जारकीहोळी. देशातील नवतरूण खासदारांच्या पलटणीतील आघाडीच्या नेत्या. त्यांचे वय अवघे २८. चिकोडी या खुल्या मतदारसंघातून निवडून आलेल्या त्या पहिल्या आदिवासी महिला खासदार. हे त्यांचे दुसरे वैशिष्ट्य...

कर्नाटकातील व आपल्या राज्याच्या सीमेला लागून असलेल्या चिकोडी या लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रियांका सतीश जारकीहोळी या अठराव्या लोकसभेतील अनेक तरूण संसद सदस्यांपेकी एक खासदार. त्यांचा जन्म १६ एप्रिल १९९७ चा. निवडून आल्या त्यावेळी केवळ २७ वर्षे वयाच्या. काँग्रेसला कर्नाटकात जे यश या लोकसभेत मिळाले त्याचे कारण अशा तरूण व सुशिक्षित उमेदवारांची निवड हे होय.

त्यांना तशी भक्कम राजकीय पार्श्वभूमीही लाभली आहे. वडील सतीश जारकीहोळी हे याच लोकसभा मतदारसंघातील यमकनमार्डी या विधानसभा मतदारसंघाचे २००८ पासून आमदार आहेत. ते काँग्रेसचे राज्यातील वरिष्ठ नेते असून काँग्रेसच्या सिद्धरामय्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्रीही आहेत.

‘जेडीएस’-काँग्रेसच्या कुमारस्वामी मंत्रिमंडळात सतीश जारकीहोळी हे वने व पर्यावरणमंत्री तर सिद्धरामय्यांच्या पहिल्या टर्ममध्ये उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री होते. तसेच प्रदेश काँग्रेसचे ते कार्यकारी अध्यक्षही होते. त्यांच्यावर काँग्रेसच्या गांधी घराण्याचा इतका प्रभाव आहे की त्यांनी आपल्या मुलीचे नाव प्रियांका तर मुलाचे नाव राहुल ठेवले आहे. त्यांचे एक भाऊ रमेश जारकीहोळी हे गोकाकचे आमदार असून ते भाजपचे माजी मंत्री आहेत. आणखी एक भाऊही भाजपमध्येच आहे. अशी राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी व वरदहस्त लाभलेल्या प्रियांका यांना बालपणापासूनच राजकारणाचे बाळकडू मिळाले.

निवडून आल्यानंतर प्रियांका यांनी देशाच्या संसदेत आपल्या भाषणांनी छाप उमटवली. त्या केंद्र सरकारच्या महिला रोजगार, सामाजिक न्याय समितीच्या सदस्या आहेत. संसदेतील पहिल्या भाषणात त्यांनी आपली मतदारसंघाबाबतची भूमिका मांडली. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चिकोडीबाबतची एक आठवण आहे. त्याबाबत त्या म्हणतात की, डॉ. आंबेडकर यांनी चिकोडीच्या न्यायालयात एक युक्तीवाद केला होता. मी त्याच चिकोडी मतदारसंघाची खासदार आहे, याचा मला अभिमान आहे.

त्यांनी पहिल्याच भाषणात देशातील तरूणांच्या प्रगतीसाठी आवाज उठवला. परीक्षांमधील गोधळाने तरूणांचा व्यवस्थेवरील विश्वास उडेल, अशी सार्थ भिती त्यांनी व्यक्त केली. एखाद्या देशाची प्रगती ही त्या देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवरून ओळखली जाते, यावर विश्वास आहे. मात्र आपल्या देशातील शिक्षणाचा स्तर घसरत चालला आहे. देशातील अनेक आव्हानांपैकी हे एक महत्वाचे आव्हान आहे. याची अनेक कारणे आहेत.

केंद्र सरकारने वार्षिक अंदाजपत्रकात शिक्षणावरील खर्चात घटवलेली तरतूद हे त्यातील महत्वाचे कारण असल्याचे प्रियांका मानतात. शिक्षणावरील तरतूद अशीच घटत गेल्यास सरकारी संस्थावर अवलंबून असलेल्या गरिबांचे जीवन अधिकच दयनीय होत आहे, यावर उपाय शोधायला हवा, असे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले होते. निवडून आल्यानंतर त्यांनी मतदारसंघातील मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करणार असून त्यांचा परिपूर्ण असा विकास करेन, असा विश्वास दिला आहे.

 MP Priyanka Jarkiholi
Kishor Patil: महायुतीत राजकीय फटाके फुटण्यास सुरवात; शिवसेनेच्या आमदारानं थेट अमित शहांचेच नाव घेतलं

काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ

चिकोडी हा काँग्रेसचा परंपरागत बालेकिल्ला. १९५७ ची पहिली निवडणूक मात्र डॉ. आंबेडकरांच्या शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनने जिंकली होती. त्यानंतर मात्र काँग्रेसचे वरिष्ठ नेते बी शंकरानंद या मतदारसंघातून तब्बल आठ वेळा (१९६२ ते १९९१) निवडून गेले. हा मतदारसंघ अजून एकदाही राखीव झालेला नाही. १९९६ मात्र या मतदारसंघावरील काँग्रेसची सद्दी संपून इतर पक्षही निवडून येऊ लागले. जनता दलाकडून रमेश जिगगिनगी हे तीन वेळा निवडून आले. त्यानंतर २००९ ला भाजप, २०१४ ला काँग्रेस, २०१९ ला भाजप व आता २०२४ ला पुन्हा काँग्रेस येथून निवडून आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com