BJP SR Santosh Left BJP After Not Getting Ticket Joined JDS : कर्नाटक विधानसभेची निवडणूक काही दिवसावर येऊन ठेपली आहे. यात 'आयाराम-गयाराम'थांबण्याचे नाव घेत नाही. भाजपला एकापाठोपाठ मोठे धक्के बसत आहे. तिकीट न मिळालेल्यांनी दुसऱ्या पक्षाचा रस्ता धरला आहे.
भाजपचे नेते, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांच्या नातवाने भाजपला सोडचिठ्ठी देत जनता दल एस म्हणजे कुमारस्वामींच्या पक्षात प्रवेश केला आहे. एनआर संतोष असे त्यांचे नाव असून त्यांनी शनिवारी एचडी कुमारस्वामी यांच्या उपस्थितीत जेडीएसमध्ये प्रवेश केला.
एनआर संतोष यांना हासन जिल्ह्यातील अससीकेरे विधानसभा मतदार संघातून जेडीएस रिंगणात उतरविणार असल्याची चर्चा आहे. संतोष हे येदियुरप्पा यांच्या बहीणीचे नातू आहेत. येदियुरप्पाचे निकटवर्तीय म्हणून संतोष यांची ओळख आहे. त्यांनी त्यांच्यासोबत कामही केले आहे. ते अससीकेरे येथे तीन वर्षापासून समाज कार्यात सक्रिय आहेत.
जेडीएसकडून निवडणूक लढविण्यास ते इच्छुक होते. पण भाजपने त्यांना तिकीट दिले नाही. संतोष यांच्या समर्थकांनी भाजपच्या विरोधात आंदोलन केलं. आपल्या नातवाचा तिकीट न दिल्याने येदियुरप्पा यांच्या बहीनींने आपल्या भावाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
काल (शुक्रवारी) रात्री माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांची संतोष यांनी भेट घेतली. दोन तासांच्या चर्चेनंतर त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, कर्नाटक राज्यातील सर्वात जुना प्रादेशिक पक्ष जनता दल सेक्युलरने (JDS) उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यात ९३ जणांची नावे आहेत. या यादीमुळे माजी पंतप्रधान एचडी.देवेगौडा परिवारातील वादाला पूर्णविराम मिळाला आहे.
जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांनी ही यादी प्रसिद्ध केली. आपल्या वहीनींना तिकीट न देण्याचा निर्धार त्यांनी पूर्ण करुन दाखवला आहे. कुमारस्वामींनी आपल्या वहीनींना तिकीट देण्याऐवजी एका सामान्य कार्यकर्त्यांला तिकीट देणं पसंत केलं आहे.
हासन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी त्यांच्या वहीनी भवानी रेवन्ना या इच्छुक होत्या. पण त्यांच्या उमेदवारीला एचडी कुमारस्वामी यांनी पहिल्यापासून विरोध केला होता.
(Edited By Mangesh Mahale)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.