

KPSC Veterinary Officer Recruitment : कर्नाटक लोकसेवा आयोगाच्या (केपीएससी) पशुवैद्यकीय अधिकारी भरती प्रक्रियेत पदवी अभ्यासक्रमात पाच विषयांत अनुत्तीर्ण झालेला एक उमेदवार कथित लाचखोरीच्या माध्यमातून अव्वल ठरल्याची धक्कादायक बाब तपासात समोर आली आहे.
महमद सुहेल बंडेगोल असे या उमेदवाराचे नाव आहे. पदवी शिक्षणादरम्यान अनेक विषयांत अनुत्तीर्ण झाल्यानंतर तो कसाबसा उत्तीर्ण झाला होता. मात्र, आता कथित आर्थिक व्यवहाराच्या जोरावर केपीएससीच्या गुणवत्ता यादीत त्याने अग्रस्थान मिळविल्याचा संशय तपास यंत्रणेच्या चौकशीत व्यक्त केला आहे.
या भरती (Recruitment) गैरप्रकारासाठी एकूण 40 लाखांचा व्यवहार ठरल्याचा आरोप आहे. तात्पुरती निवड यादी जाहीर होण्यापूर्वी उमेदवाराने आगाऊ 20 लाख दिल्याची बाब सीआयडीच्या चौकशीत समोर आली आहे. तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध झाल्यानंतर उर्वरित 20 लाख देण्याचे ठरल्याचेही तपासात उघड झाल्याचे सांगण्यात येत आहे.
तपास अधिकाऱ्यांसमोर संबंधित उमेदवारानेच या आर्थिक व्यवहाराबाबत माहिती दिल्याचा दावा केला आहे. परीक्षा (Exam) व्यवस्थेत कथित हस्तक्षेप करण्यासाठी काही प्रभावशाली व्यक्ती आणि मध्यस्थांनी हातमिळवणी केल्याचा संशयही तपासात व्यक्त झाला आहे.
सुमारे400 पशुवैद्यकीय अधिकारी पदांच्या भरतीतील गैरप्रकारांचे आरोप जुलै महिन्यात समोर आले होते. या प्रकरणात काही मध्यस्थांनी उमेदवारांकडून 70 ते 80 लाख मागितल्याचा आरोप होता. काही उमेदवारांनी यासंदर्भातील ऑडिओ, छायाचित्रे आणि इतर पुरावे पोलिसांकडे सादर केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर या प्रकरणाशी संबंधित एफआयआरचा तपास सीआयडीकडे वर्ग केला. प्रश्नपत्रिका फुटणे, ओएमआर उत्तरपत्रिकांमध्ये कथित फेरफार तसेच निवड प्रक्रियेवर प्रभाव टाकल्याच्या आरोपांची चौकशी सुरू आहे.
दरम्यान, तपासात आणखी एक गंभीर आरोप समोर आला आहे. पैसे दिलेल्या उमेदवारांना बंगळूर, तुमकूर जिल्ह्यातील देवरायनदुर्ग तसेच आंध्र प्रदेशातील काही ठिकाणच्या रिसॉर्टमध्ये ठेवून प्रशिक्षण दिल्याचा संशय आहे. परीक्षेपूर्वी त्यांना प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्याचाही आरोप आहे.
दोन सप्टेंबरच्या अहवालांनुसार किमान सहा उमेदवारांनी पैसे देऊन परीक्षा दिल्याची कबुली दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या घरांता झडती आणि चौकशीतून तपास अधिकाऱ्यांना आणखी महत्त्वाची माहिती मिळाल्याचे वृत्त आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.