BJP News : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. एकीकडे इंडिया आघाडीत जागावाटपावरून खलबतं सुरू असताना भाजपने जानेवारी महिन्याच्या अखेरीस किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्याची रणनीती आखल्याचे समजते. प्रामुख्याने अडचणीच्या मतदारसंघांवर भाजपने अधिक लक्ष केंद्रित केले असून त्यात महाराष्ट्रातील काही मतदारसंघांचाही समावेश आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) भाजपकडून (BJP) फुलप्रुफ प्लॅन बनवला जात आहे. त्यासाठी पक्षातील महत्वाच्या नेत्यांची जम्बो बैठक फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. या बैठकीत राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांसह राज्य कार्यकारिणी, संसदीय दलाचे प्रतिनिधी, विधिमंडळ पक्षनेते यांसह इतर प्रमुख नेत्यांचा समावेश असेल.
महाराष्ट्रावरही नजर
आगामी निवडणुकीत अधिकाधिक जागांवर उमेदवार उतरवण्याची तयारी भाजपने केली आहे. प्रामुख्याने भाजपला आतापर्यंत विजय मिळू न शकलेल्या तसेच एनडीएतून बाहेर पडलेल्या पक्षांच्या जागांवर भाजपचा डोळा आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) शिवसेनेत दोन गट पडल्याने काही जागांवर फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हीच स्थिती नितीश कुमारांमुळे बिहारमध्येही आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अधिकाधिक उमेदवार देणार
मागील निवडणुकीत भाजपने 543 पैकी 436 जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यापैकी केवळ 133 जागांवर पराभव झाला. या निवडणुकीत अधिकाधिक उमेदवार उभे करून 350 चा आकडा पार करण्याचा प्लॅन भाजपने बनवला आहे. त्यासाठी निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधीच अशा उमेदवारांची नावे जाहीर करण्याचे नियोजन आहे.
निवडणुकीच्या तारखांआधीच उमेदवारी याद्या
जानेवारी महिन्याच्या अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), अमित शाह, राजनाथ सिंह यांच्यासह काही प्रमुख नेत्यांची यादी जाहीर करून त्यानंतर काही अडचणीतील जागांवरील उमेदवारही जाहीर केले जाऊ शकतात. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्येही भाजपने निवडणुकांच्या तारख जाहीर होण्याआधीच उमेदवार जाहीर केले होते. त्याचा फायदाही झाल्याचा दावा भाजपच्या नेत्यांकडून केला जात आहे. हीच रणनीती लोकसभा निवणुकीतही वापरली जाऊ शकते.
राज्यसभा सदस्य मैदानात
राज्यसभेच्या दोन टर्म पूर्ण केलेल्या सदस्यांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्यासाठी भाजपची तयारी सुरू आहे. त्यांच्या राज्यात किंवा त्यांना सोयीच्या असलेल्या मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते. त्यासाठी चाचपणी सुरू असल्याचे समजते. भाजपसाठी फारसे चांगले वातावरण नसलेल्या मतदारसंघातूनही अशा उमेदवारांना तिकीट दिले जाण्याची शक्यता व्यक्त केल जात आहे. याबाबत जम्बो बैठकीत अंतिम निर्णय होईल, असे दिसते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.