Lok Sabha Election 2024 Result : काश्मीर ते कन्याकुमारी... ‘या’ हायप्रोफाइल लढतींकडे अवघ्या देशाचं लक्ष

Election Results 2024 NDA Vs India Alliance Narendra Modi Vs Rahul Gandhi : नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार की इंडिया आघाडी जादूची कांडी फिरवणार, हे मंगळवारी स्पष्ट होणार आहे.
Rahul Gandhi, Narendra Modi
Rahul Gandhi, Narendra ModiSarkarnama

Lok Sabha Election 2024 Update : अवघ्या जगाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी (ता. 4) स्पष्ट होईल. एक्झिट पोलने ‘एनडीए’च्या बाजूने कल दिला असला तरी इंडिया आघाडीचा आत्मविश्वासही कमी झालेली नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचंच नाणं खणखणणार की काँग्रेस नेते राहुल गांधींची ‘आँधी येणार, याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

इंडिया आघाडीसाठी ही निवडणूक ‘करो या मरो’ अशी आहे. काँग्रेससह देशातील काही प्रादेशिक पक्ष, नेत्यांचे राजकीय भवितव्य या निवडणुकीच्या निकालावर अवलंबून आहे. तर दुसरीकडे मोदी पुन्हा विजयीरथामधून संसदेत गेल्यास भारतासह संपूर्ण जगात त्यांचा डंका जगभरात दणक्यात वाजणार आहे.

देशातील काही हायप्रोफाइल लढतींकडेही लक्ष लागलं आहे. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत अनेक मतदारसंघात ‘काँटे की टक्कर’ होणार आहे. एक्झिट पोलने अनेकांच धाबे दणाणले असून अनेक जण सुखावलेही आहेत. पण प्रत्यक्षात निकाल काय लागणार, कोण किंगमेकर, जायंट किलर ठरणार, हे काही तासांतच समजणार आहे.

नरेंद्र मोदी, अमित शाह

वाराणसी लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गांधीनगरमध्ये अमित शाह किती मताधिक्याने विजयी होणार, याचीच उत्सुकता आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसने अनुक्रमे अजय रॉय आणि सोनल पटेल यांना उमेदवारी दिली आहे.

राहुल गांधी, स्मृती इराणी

काँग्रेस नेते राहुल गांधी यावेळी वायनाड आणि रायबरेली या दोन मतदारसंघात नशीब आजमावत आहेत. दोन्ही मतदारसंघात त्यांचा विजय निश्चित मानला जात असला तरी भाजपच्या दाव्यांनी धडकी भरवली आहे. मागील निवडणुकीत त्यांचा भाजपच्या स्मृती इराणींनी अमेठीत पराभव केला होता. यावेळी इराणींविरोधात काँग्रेस के. एल. शर्मा यांना उतरवलं आहे. त्यामुळे या लढतही महत्वाची ठरणार आहे. 

Rahul Gandhi, Narendra Modi
Election Commmission : आयोगाची ‘हिट’ विकेट’; 2029 च्या निवडणुकीबाबत मोठी घोषणा

उमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती

कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरमध्ये पहिल्यांदाच होत असलेल्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि उमर अब्दुल्ला यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीत भाजपने उमेदवार दिलेले नाहीत. पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्समध्ये थेट लढत होत आहे.

सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार

देशात सर्वात हायप्रोफाईल लढतींपैकी एक लढत बारामतीत होत आहे. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार रिंगणात आहेत. ही लढत या दोघींमध्ये असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवारांमध्येच खरा सामना होत आहे.

अखिलेश यादव, मीसा भारती

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादवही यावेळी मैदानात आहेत. कनौजमध्ये भाजपच्या सुब्रत पाठक यांचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. पाठक यांनी अखिलेश यांच्या पत्नी डिंपल यांचा मागील निवडणुकीत पराभव केला होता. बिहारमध्ये माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यांच्या कन्या मीसा भारती यावेळी नशीब आजमावत आहेत.

के. अण्णामलाई

दक्षिण भारतातील भाजपचा लोकप्रिय चेहरा म्हणून तमिळनाडून भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांच्याकडे पाहिले जाते. ते कोईम्बतूरमधून उमेदवार असून डीएमकेचे खडतर आव्हान समोर आहे. त्यांच्या लढत हायप्रोफाईल मानली जात आहे.

शशी शरूर, राजीव चंद्रशेखर

केरळातील तिरवअनंतपुरमध्ये आजी-माजी केंद्रीय मंत्र्यांमध्ये लढत होत आहे. काँग्रेसचे शशी थरूर आणि भाजपचे राजीव चंद्रशेखर समोरासमोर असून या मतदारसंघात ‘काँटे की टक्कर’ होऊ शकते.

दिग्विजय सिंह, भूपेश बघेल, नकुलनाथ

माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह आणि भूपेश बघेल यावेळी मैदानात आहेत. त्याचप्रमाणे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नुकलनाथही नशीब आजमावत आहेत. तिन्ही माजी मुख्यमंत्री गांधी कुटुंबाचे विश्वासू नेते असल्याने त्यांच्या लढती प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत. 

अधीर रंजन चौधरी, अभिषेक बॅनर्जी

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील वाद जगजाहीर आहे. त्यामुळे चौधरींना पराभूत करण्यासाठी ममतांनी कंबर कसली आहे. चौधरी ममतांवर मात करून दाखवणार का, हे मतत्वाचे ठरणार आहे.

असदुद्दीन ओवेसी, माधवी लता

हैदराबाद मतदारसंघातही हायप्रोफाईल लढत होत आहे. एआयएमएमचे विद्ममान खासदार असदुद्दीन ओवेसी आणि भाजपच्या माधवी लता एकमेकांवर उभे ठाकले आहेत. प्रचारादरम्यान टोकाची विधाने करण्यात आली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com