Patna News : लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने इंडिया आघाडीला मोठा धक्का दिला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना एनडीए आघाडीत समावेश करीत पुन्हा मुख्यमंत्रिपद दिले आहे. दीड महिन्यापूर्वीच भाजपने मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तीन राज्यात प्रत्येकी दोन याप्रमाणे सहा उपमुख्यमंत्री नेमत पंतप्रधान मोदींनी धक्कातंत्राचा वापर केला होता.
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने तीन राज्यांप्रमाणेच आता बिहारमध्ये 'महाराष्ट्र पॅटर्न'चा अवलंब केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या मदतीला दोन उपमुख्यमंत्री देत पंतप्रधान मोदी यांनी सोशल इंजिनिअरिंगच्या त्रिकोण फॉर्म्युल्याचा वापर केला आहे. बिहारच्या उपमुख्यमंत्रिपदी भाजप नेते सम्राट चौधरी, विजय सिन्हा यांची वर्णी लागली आहे.
दीड वर्षापूर्वी महाराष्ट्रातही त्यांनी नवा प्रयोग केला. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करून पक्षाने बलाढ्य नेत्यांना चकित केले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना व राष्ट्रवादीचे अजित पवार (Ajit pawar) यांना उपमुख्यमंत्री केले. भाजपने महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातही दोन उपमुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला आजमावला आहे. यापूर्वी केशव प्रसाद मौर्य आणि प्रथम दिनेश शर्मा आणि त्यानंतर ब्रिजेश पाठक यांना उपमुख्यमंत्री बनवल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये हा प्रयोग करण्यात आला होता.
त्यामुळे हा फॉर्म्युला यशस्वीपणे काम करीत असल्याचा दावा भाजपने केला आहे. त्यामुळेच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने या बिहारमध्ये 'महाराष्ट्र पॅटर्न'चा अवलंब केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या मदतीला बिहारमध्ये भाजप नेते सम्राट चौधरी, विजय सिन्हा यांची वर्णी लागली आहे. दोन उपमुख्यमंत्री देत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जुळवाजुळव केली असल्याची चर्चा आहे.
दीड महिन्यापूर्वी चार राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवल्यानंतर राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, उपमुख्यमंत्री म्हणून दिया कुमारी आणि प्रेमचंद्र बैरवा यांना संधी दिली आहे. छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री म्हणून विष्णूदेव साय, तर उपमुख्यमंत्रिपदी अर्जुन साव, विजय शर्मा, तर मध्य प्रदेशात मोहन यादव याची नेमणूक मुख्यमंत्रिपदी केली आहे. दुसरीकडे जगदीश देवडा, तर राजेंद्र शुक्ला हे उपमुख्यमंत्री म्हणून नेमणूक केली होती.
कोणताही घटनात्मक दर्जा नसलेले इतर कॅबिनेटमंत्र्यांच्या श्रेणीत मोडणारे उपमुख्यमंत्रिपद हे खरे तर राजकीय तडजोड मानले जाते. अनेक राज्यांमध्ये एकापेक्षा जास्त उपमुख्यमंत्री आहेत. ज्यामध्ये आंध्र प्रदेश अव्वल आहे, जिथे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी 5 जणांना उपमुख्यमंत्री केले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भाजपचा दोन-दोन उपमुख्यमंत्री देण्याचा पायंडा
या सर्व राज्यांमधील अडचणी वेगळ्या असू शकतात. तथापि प्रबळ सत्ता असताना भाजपशासित राज्यांमध्ये उपमुख्यमंत्र्यांची वर्णी लावली जात आहे. हा पंतप्रधान मोदी, केंद्रीयमंत्री अमित शाह एकाच वेळी अनेकांना सत्तेचा लाभ देण्याचा आणि त्यातून सत्ता बळकट करण्याचा प्रयोग केला असल्याचे दिसते. त्यातही एक-दोन नव्हे, तर दोन-दोन उपमुख्यमंत्री देण्याचा पायंडा भाजपने पाडला आहे.
आंध्र प्रदेशमध्ये जगनमोहन रेड्डी यांनी 5 जणांना उपमुख्यमंत्री केले आहे. त्याखालोखाल महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या राज्यात प्रत्येकी दोन, तर इतर राज्यात प्रत्येकी एक उपमुख्यमंत्री आहेत. आंध्र प्रदेश 5, अरुणाचल 1, बिहार 2, दिल्ली 1, हरियाना 1, महाराष्ट्र 2, मेघालय 1, तेलंगण 1, नागालँड 1, त्रिपुरा 1, उत्तर प्रदेश 2, मध्य प्रदेश 2, राजस्थान 2, छत्तीसगड 2.