Maharashtra Lok Sabha 2024 Result Analysis: बाळ्यामामा, प्रतिभाताई, बजरंग बाप्पा ठरले लईच ताकदवान; 7 जण जायंट किलर

Lok Sabha Election 2024 Result Analysis: कल्याण काळे, निलेश लंके, भास्कर भगरे, प्रतिभा धानोरकर, बजरंग सोनवणे, बळवंत वानखेडे, सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) महाराष्ट्रातील उमेदवारांनी बड्या नेत्यांना अस्मान दाखवत दिल्ली गाठली.
Maharashtra Lok Sabha 2024 Result Analysis
Maharashtra Lok Sabha 2024 Result AnalysisSarkarnama

Maharashtra Lok Sabha 2024 Result Analysis: महाराष्ट्रात 45 प्लसचे स्वप्न पाहणाऱ्या महायुतीला मतदारांनी लोकसभा निवडणुकीत जागा दाखवून दिली. भाजपला एक अंकी जागेवर समाधान मानावे लागले. सर्वाधिक जागा काँग्रेसने पटकावल्या. निवडणुकीत अनेक बड्या नेत्यांना नवख्या उमेदवारांनी धुळ चारली. पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना मतदारांनी पसंती दिली.

राज्यातील सात जण चांगल्या मताधिक्क्यानं घेऊन जायंट किलर ठरले आहेत. कल्याण काळे, नीलेश लंके, भास्कर भगरे, प्रतिभा धानोरकर, बजरंग सोनवणे, बळवंत वानखेडे, सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी बड्या नेत्यांना अस्मान दाखवत दिल्ली गाठली.

प्रतिभा धानोरकर

भाजपचे ज्येष्ठ नेते, कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव करून प्रतिभा धानोरकर या जायंट किलर ठरल्या. त्यांना त्यांचे पती दिवंगत बाळू धानोरकर यांच्यापेक्षा जास्त मताधिक्य मिळाले. 30 वर्षांपासून अधिक काळ राजकारणात असलेल्या मुनगंटीवारांना प्रतिभाताईंनी घरचा रस्ता दाखवला. त्यांनी तब्बल अडीच लाख मतांनी मुनगंटीवारांना पराभूत केलं. 2019च्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांना पराभूत करुन बाळू धानोरकर हे देखील जायंट किलर ठरले होते.

Maharashtra Lok Sabha 2024 Result Analysis
BJP Lose Ayodhya Analysis: रामजन्मभूमीत भाजपचा पाडाव का?

भास्कर भगरे

दिंडोरी मतदारसंघात ऐन निवडणुकीच्या काळात कांदा निर्यातबंदीचा मुद्दा गाजला. विद्यमान खासदार भारती पवार यांना कांद्यानं 'रडवलं', त्यांना शरद पवारांचे शिलेदार भास्कर भगरे यांनी हरवलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून भगरे हे पहिल्यांदा लोकसभेच्या मैदानात उतरवलं होते. 1,13,199 मतांनी भगरे यांनी भारती पवार यांचा पराभवाची धूळ चारली. शिक्षक असलेले भगरे यांना वारकरी संप्रदाय आवडतो. भारती पवारांना भाजपने दुसऱ्यांदा दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून संधी दिली होती.

नीलेश लंके

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी दादांच्या राष्ट्रवादीत न जाता साहेबांच्या राष्ट्रवादीत जाणे पसंत केले. सुरवातीला अजित पवार यांच्यासोबत असलेल्या लंकेनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांना साथ देत हाती 'तुतारी'घेतली. आमदार रोहित पवारांनी लंकेना निवडून आणण्यासाठी जोर लावला. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात लंकेंनी भाजपचे विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे यांचा पराभव केला. शेवटच्या क्षणापर्यंत झालेल्या चुरशीच्या लढतीत त्यांनी 28 हजार मतांनी विखेंचा पराभव केला.

Maharashtra Lok Sabha 2024 Result Analysis
BJP Politics: राणे बंधूंचे तोंड पुन्हा सुटलंय...भाजपचे नेतृत्व आतातरी आवर घालणार का?

कल्याण काळे

जालना लोकसभा मतदारसंघातून सलग पाचवेळा खासदार असलेल्या रावसाहेब दानवे यांचा पराभव काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी केला. काळे हे फुलंब्री मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. हेवीवेट मंत्री असलेल्या दानवे यांचा त्यांनी तब्बल एक लाख मतांनी पराभव झाला आहे. 2019 ला जवळपास साडेतीन लाख मतांनी दानवे विजयी झाले होते. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनाचा दानवेंना फटका बसल्याचे बोलले जाते. त्यांच्या पराभवाला जरांगे फॅक्टर कारणीभूत ठरला.

बजरंग सोनवणे

पंकजा मुंडे यांच्या राजकीय पुनवर्सनासाठी भाजपने त्यांना बीड लोकसभा मतदारसंघातील रिंगणात उतवले होते. पंकजा यांची बहीण विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचे तिकीट कापून पंकजा यांना भाजपनं संधी दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून बजरंग सोनवणे हे उमेदवार होते. मतमोजणीत सुरवातीपासून मुंडे- सोनवणे यांच्यात चढाओढ होती. अटीतटीच्या या लढतीत सोनवणे यांनी बाजी मारली. त्यांनी 6 हजार 555 मतांनी पंकजा मुंडेंचा पराभव केला. मराठा फॅक्टरने बीडचा खासदार ठरवला, असे बोलले जाते.

बळवंत वानखेडे

दर्यापूरचे आमदार बळवंत वानखेडे यांना काँग्रेसनं अमरावतीमधून मैदानात उतरवले होते. त्यांची लढत निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नवनीत राणा यांच्याशी झाली. आक्रमक आमदार बच्चू कडू यांनी निवडणुकीत उडी घेतल्याने निवडणूक अधिक रंगतदार झाली. बच्चू कडू यांच्या प्रहारकडून दिनेश बूब हे उमेदवार होते. बळवंत वानखडे यांची राजकीय वाटचाल ही ग्रामपंचायत सदस्य, सरपंच पुढे जिल्हा परिषद, त्यानंतर दर्यापूरचे आमदार अशी आहे. 'प्रहार'चे उमेदवार दिनेश बूब यांना ८५ हजार मते मिळाल्याने वानखेडे यांचा विजय सोपा झाला. नवनीत राणा यांना पराभूत वानखेडे 19 हजार मतांनी निवडून आले.

सुरेश म्हात्रे

भिंवडी लोकसभा मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांना रिंगणात उतवले होते. बाळ्यामामांनी केंद्र सरकारच्या पंचायती राज मंत्रालयाचे राज्यमंत्री कपिल पाटील यांनी धूळ चारली. सुमारे 80 हजार मतांनी कपिल पाटील यांचा पराभव करुन बाळ्यामामा जायंट किलर ठरले. कपिल पाटील यांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरेश म्हात्रे यांनी 2014 मध्ये मनसेकडून उमेदवारी घेत कपिल पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवत, तब्बल सव्वा लाखाच्या आसपास मतदान घेतलं होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.