BJP Politics: राणे बंधूंचे तोंड पुन्हा सुटलंय...भाजपचे नेतृत्व आतातरी आवर घालणार का?

Maharashtra Politics BJP Nilesh Rane Nitesh Rane Hate Speeches : गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना नागरिक कंटाळून गेले होते. काही नेत्यांच्या मर्यादा सोडून केल्या जाणाऱ्या बडबडीने लोकांचे डोके उठून गेले होते. लोकसभा निवडणुकीनंतर असे प्रकार थांबतील, ही अपेक्षा फोल ठरली आहे.
Nilesh Rane Nilesh Rane Maharashtra Politics
Nilesh Rane Nilesh Rane Maharashtra Politics Sarkarnama
Published on
Updated on

लोकहो, वाचाळवीरांची बडबड तुमचा पिच्छा काही सोडणार नाही. ते सहन करण्यासाठी आता पुन्हा तयार राहा. सकाळ, दुपार, संध्याकाळ वाचाळवीरांची निरर्थक बडबड ऐकून महाराष्ट्रातील नागरिक पार कंटाळून गेले होते. आम्ही हे खपवून घेणार नाही, असा संदेश लोकांनी दिल्यानंतरही पुन्हा तसेच प्रकार सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत. आमदार नितेश राणे यांनी त्याची सुरुवात केली आहे.

मी ज्या दिवशी हिंदू-मुस्लिम करीन त्या दिवशी मी सार्वजनिक जीवनात राहण्यासाठी योग्य नसेन, असे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते.

मोदी यांचे हे वक्तव्य आणि महाराष्ट्रातील मतदारांनी भाजपच्या (BJP) खासदारांची संख्या एकआकडी केल्यानंतरही काही वाचाळवीरांना भान आलेले नाही. सतत वादग्रस्त विधाने करणाऱ्या आमदार नितेश राणे यांनी आपल्या तोंडाचा पट्टा पुन्हा सुरू केला आहे. परभणीचे खासदार संजय जाधव यांचा संदर्भ देत त्यांनी पुन्हा हिंदू-मुस्लिम असा खेळ सुरू केला आहे.

गेल्या निवडणुकीत भाजपचे २३ खासदार निवडून आले आहेत. या निवडणुकीत ती संख्या ९ वर आली आहे. गेल्या पाच वर्षांत राज्यात घडलेल्या घडामोडी मतदारांना आवडल्या नाहीत, असा संदेश या निकालाने भाजपला दिला. विशेष म्हणजे, मतदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्वीकारले नाही.

दोन टप्प्यांचे मतदान झाल्यानंतर भाजपने धार्मिक ध्रुवीकरण होईल, असा प्रचार सुरू केला. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्यावरही त्यांच्या काही वक्तव्यांवरून चहूबाजूंनी टीका झाली. त्यानंतर मोदींनी स्पष्टीकरण दिले होते. मोदी यांचे स्पष्टीकरण आणि राज्यात झालेली भाजपची वाताहत, देशात न मिळालेले स्पष्ट बहुमत यापासून आमदार नितेश राणे यांच्यासारख्या वाचाळ नेत्यांनी कोणत्याही प्रकारचा धडा घेतलेला दिसत नाही.

आपण मुस्लिम मतांमुळे निवडून आलो, असे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी म्हटले आहे, असे आमदार राणे म्हणतात. हे लोक (महाविकास आघाडी) संविधान वाचवण्यासाठी लढले की शरिया कायदा लागू करण्यासाठी लढले, याचे उत्तर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी द्यावे, असे आमदार राणे म्हणाले आहेत.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या आधी टिपू सुलतान आणि औरंगजेबाचे स्मारक बांधा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली तर आश्चर्य वाटायला नको, असेही ते म्हणाले आहेत. गेली पाच वर्षे नितेश राणे यांनी अशीच वक्तव्ये केली आहेत. निवडणुकीत मतदारांनी दाणादाण उडवल्यानंतरही भाजप आपला मूळ अजेंडा सोडणार नाही, असा संदेश आमदार राणे यांच्या विधानांतून मिळतो आहे.

Nilesh Rane Nilesh Rane Maharashtra Politics
Dr. Rahul Aher: आमदार राहुल आहेर यांना चांदवडकरांनी दाखवला हिसका...

भारतात शरिया कायदा कसा लागू होऊ शकतो, याचे उत्तर आमदार राणे यांनी दिले पाहिजे. मुस्लिमांनी मते दिली ती शरिया कायदा लागू करण्यासाठी दिली का, याचेही उत्तर राणे आणि भाजपला द्यावे लागेल. भाजप हा लोकशाही देश आहे. मग त्यात शरिया कायदा कसा लागू होऊ शकतो, तशी मागणी आतापर्यंत कुणी केलेली आहे का?

मुस्लिमांनी महायुतीला मते दिलीच नाहीत, असे राणे इतक्या ठामपणे कसे सांगू शकत असतील? महायुतीत जे काही मुस्लिम नेते, कार्यकर्ते आहेत, त्यांनीही भाजपला मते दिली नसतील का? कुणी कुणाला मत द्यावे, याचा अधिकार घटनेने दिला आहे. घटनेने नागरिकांना दिलेला अधिकार आमदार राणेचं काय, कुणीही नाकारू शकत नाही.

उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावर सतत टीका करण्यासाठी भाजपने फौजच तयार केली होती. त्यात आमदार नितेश राणे यांचे स्थान अगदीवर होते. ते कायम ठेवण्यासाठी त्यांनी धडपड सुरू केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि चित्रा वाघ यांनीही बोलायला सुरुवात केली आहे.

विरोधकांवर टीका, आरोप केलेच जातात, अगदी जुन्या काळापासून. आताच्या राजकारणात भाषेची मर्यादा, शालीनता दिसून येत नाही. विशेष म्हणजे, लोकांना ते आवडलेले नाही हे स्पष्ट झाल्यानंतरही तसे प्रकार पुन्हा सुरू झाले आहेत. आता भाजपकडून तोंडाचा पट्टा सुरू झाला आहे, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी महाविकास आघाडीकडून सुरू होईल. गेली पाच वर्षे नागरिक ज्याला कंटाळले होते, त्यातून सुटका होण्याची चिन्हे दिसत नाहीत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com