

Mamata Banerjee car attack : तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा, पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या गाडीवर रविवारी जमावाकडून हल्ला करण्यात आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूलचे काही नेते व पदाधिकाऱ्यांवर अंडीफेकीच्या अनेक घटना घडल्या. त्यानंतर आता थेट ममतादीदींच्या गाडीवरच हल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
ममता बॅनर्जी या रविवारी उत्तर २४ परगणामधील बिजपूर येथे गेल्या होत्या. पोलीस कोठडीत पक्षाच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप पक्षाकडून करण्यात आला आहे. या कार्यकर्त्याच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी त्या गेल्या होत्या. यादरम्यान रस्त्यातच आक्रमक झालेल्या जमावाने त्यांच्या गाडीला घेरले. आपल्या गाडीवर मोठे दगड, चिखल, चपला फेकण्यात आल्याचा दावा ममतांनी केला आहे.
पोलीस कोठडीत तब्येत बिघडल्यानंतर कार्यकर्त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी पोलीस कोठडीत त्याला मारहाण केल्याचा आरोप कुटुंबियांसह स्थानिकांकडून केला जात आहे. हा मुद्दा तृणमूल काँग्रेसनेही उचलून धरला आहे. त्यासाठी ममता बॅनर्जी कार्यकर्त्याच्या घरी गेल्या होत्या.
स्थानिकांमध्ये पोलिसांविरोधात प्रचंड रोष असून त्याचा सामना ममतादीदींनाही करावा लागल्याचे वृत्त आहे. वातावरण बिघडविण्यासाठी ममतादीदी आल्याचा दावा करत स्थानिकांनी त्यांना दौऱ्याला विरोध केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, ममतादीदींनी हे आपल्याविरोधात षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी आम्ही आधीच दौऱ्याची माहिती दिली होती. पण त्यानंतर पुरेशी सुरक्षा तैनात करण्यात आली नाही. आमच्या गाडीची काच उघडी असती तर डोकं फुटलं असतं, असा दावाही त्यांनी केला.
सत्ताधारी भाजपकडूनही या हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सामिक भट्टाचार्य म्हणाले, माजी मुख्यमंत्र्यांच्या वाहनावर असा हल्ला करणे योग्य नाही. या घटनेमध्ये भाजपचा एकही कार्यकर्ता नव्हता. माजी महिला मुख्यमंत्र्यांसोबत अशी घटना घडणे, अनुचित आहे. अशा घटनांमुळे राज्याची प्रतिमा खराब होते. पोलिसांनी तात्काळ याबाबत कारवाई करावी.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.