Marathi leaders in Delhi: मराठी नेत्यांचा दिल्लीत दबदबा आहे का? देशासाठी काय केले?

Maharashtra Politics Marathi leaders Impact in Delhi: मराठी नेत्यांनी आपल्या राज्यासाठी एक लॉबी म्हणून काम केले का? आणि अशी लॉबी असणे म्हणजे महाराष्ट्राचा दबदबा आहे का? याचा मागोवा घेतला तर वेगवेगळी उत्तरे मिळतात.
Marathi leaders in Delhi
Marathi leaders in DelhiSarkarnama
Published on
Updated on

राजकारण आणि नेत्यांचे मुल्यमापन करण्यासाठी त्यांच्याबद्दल लोक काय बोलतात आणि त्यांनी केलेले लेखन हा मार्ग असतो. त्यांचे काम हा तर प्रत्यक्ष दाखला असतो पण त्यात टीमवर्कचाही भाग मोठा असतो त्यामुळे सगळे श्रेय त्यांना देता येत नाही. आपल्याकडे राज्यघटनेने नोकरशाहीला अंमलबजावणीचा आणि मंत्री व नेते यांना धोरण ठरवण्याचा अधिकार दिला आहे. अनेकांना ही विभागणी लक्षात येत नाही.

त्यामुळे काही वेळा नको त्या कारणासाठी राजकीय मंडळींवर अज्ञानातून टीका केली जाते, काही वेळा जे अधिकाऱ्याचे काम असते त्यासाठी त्या नेत्याला श्रेय दिले जाते. मात्र काय नेमके शोधायचे याची जाण ठेवून केलेले लेखन म्हणजे ‘महामुद्रा -दिल्लीतील मराठी कर्तृत्व’ हे पुस्तक होय. ‘सरहद्द पुणे’ या सेवाभावी संस्थेच्या सहकार्याने शुभम प्रकाशनाकडून प्रसिद्ध होणाऱ्या ग्रंथमालिकेतील हा पहिला खंड आहे.

यामध्ये दिल्लीत ज्या मराठी नेत्यांनी दूरगामी निर्णय घेतले त्यांच्या कार्याचा वेध घेण्यात आलाय. मुळात अशा स्वरुपाची कल्पना आल्यावर, त्यांचा गौरवग्रंथ किंवा त्या नेत्याचे कौतुक करणारे पुस्तक असा प्रकार होण्याची दाट शक्यता होती. त्याबाबतीत लेखक आणि प्रकाशकाने ठाम धोरण स्वीकारून एक संदर्भग्रंथ करायचा ही चौकट निश्‍चित केली, त्यामुळे तो धोका इथे टळला आहे. यात नेत्याच्या कार्यकर्तृत्वाचा तटस्थपणाने वेध घेतला गेलाय.

त्यामुळेच सर्व पक्षाचे आणि विविध गटाचे नेते असलेले नेते इथे दिसतात. मुळात दिल्लीत महाराष्ट्र दिसत नाही, दिल्लीत मराठी नेत्याला कोणी विचारत नाही, अशी तक्रार केली जाते. त्या तक्रारीला खरे मानून बऱ्याचवेळा माध्यमेदेखील ही दुखरी वेदना असल्याचे प्रदर्शन करतात. मात्र हे पुस्तक व त्यातला तपशील वाचल्यावर दिल्लीत महाराष्ट्र आहे की नाही याचे उत्तर नेमकेपणाने मिळेल.

दिल्लीत महाराष्ट्र आहेच, पण मराठी नेत्यांनी आपल्या राज्यासाठी एक लॉबी म्हणून काम केले का? आणि अशी लॉबी असणे म्हणजे महाराष्ट्राचा दबदबा आहे का? याचा मागोवा घेतला तर वेगवेगळी उत्तरे मिळतात. पण महाराष्ट्राने दिल्लीत आपल्या देशासाठी काय केले याचा मागोवा घेतल्यावर हे पुस्तक बरीच माहिती देऊ शकेल. त्यामुळे कामगारांकडून देशभरच बोनसची मागणी करताना ती ८.३३ टक्के केली जाते, ती कशी आली आणि ती मुळात कुणाच्यामुळे लोकसभेत सादर झाली, त्यासाठी तपशीलवार अभ्यास कुणी केला? तर त्याचे उत्तर त्यावेळचे केंद्रीय कायदामंत्री रघुनाथ केशव खाडिलकर यांनी. त्यांनी नेमके काय केले ते त्याच्यावरील प्रकरणातून समजतेच, पण त्यांचा राजकीय प्रवासही पटकन कळतो.

या पुस्तकात महत्त्वाचे पथ्य लेखकाने पाळले आहे, ते म्हणजे नेत्यांबद्दलच्या दंतकथा आणि अनुयायांनी सांगतलेल्या ‘पराक्रमकथा’ यांना फाटा देऊन ज्याला ठोस आधार आहेत त्याच गोष्टी इथे मांडल्या आहेत. त्यामुळेच केंद्रीय मंत्री मोहन धारिया यांनी मंत्रिपदाच्या कार्यकाळात अन्नधान्य पुरवठ्याची साखळी कशी मजबूत केली, तसेच जीवनावश्‍यक वस्तूंचे भाव कसे वाढू दिले नाहीत हे कळते.

Marathi leaders in Delhi
Prakash Deole : गोपीनाथ मुंडेंची खेळी अन् बाळासाहेबांचा मास्टरस्ट्रोक; शेवटच्या काही मिनिटांत अर्ज भरून प्रकाश देवळे आमदार झाले!

हीच बाब ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबतीत घडते. संरक्षणमंत्रिपदावरून काम करताना त्यांनी कोणते बदल केले ते यातल्या माहितीवरून कळते, त्यासाठी सांगोवांगी गोष्टीवर भर न देता माजी लष्करप्रमुखांनी त्यांच्या आत्मचरित्रात काय नोंदी केल्यात, याचा लेखकाने इथे वेध घेतलाय. सियाचीनबाबत पवार यांनी या प्रश्‍नांची वेगळी बाजू लक्षात घेऊन देशाचा मोठा खर्च कसा वाचवला आणि प्रत्येकवेळी देशप्रेमाचा अतिरेक न करता व्यवहार्य तोडगा कसा काढता येतो, त्यासाठी चीनला कसे तयार केले हे कळते. त्यावेळचे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्यासारख्या परराष्ट्र व्यवहारातला तज्ज्ञ माणूसदेखील पवार यांना सहकार्य करण्यास कसा तयार होतो हे कळते.

पवार यांनी आंतरराष्ट्रीय प्रश्‍न नेमक्या पद्धतीने मार्गी लावला, तसेच देशातील शेतकऱ्यांना उत्तेजन देऊन धान्याचे उत्पादन कसे वाढवले, कृषिमंत्री म्हणून त्यांनी खरोखर मूलगामी असे काय बदल केले आणि देशाला अन्नधान्यांच्या उत्पादनाच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय पातळीवर नोंद घेण्याएवढे सक्षम कसे बनवले हे या पुस्तकातून ठळकपणे लक्षात येते. त्यांच्या काळात देशातल्या कृषिमंत्र्यांवर फारशी टीका का झाली नाही, माध्यमांना तसा कुठलाही मुद्दा कसा सापडला नाही या प्रश्‍नाचे उत्तर देखील या पुस्तकातील माहितीवरून मिळते.

Marathi leaders in Delhi
Pune Graduate Constituency Election: 'पदवीधर’साठी महायुती रेस! भाजप अन् राष्ट्रवादीने ठोकला शड्डू

या पुस्तकातील पहिलेच प्रकरण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कामाची नोंद घेणारे आहे. हेच प्रकरण पहिले असणे योग्य आहे. देशाच्या प्रगतीत आणि स्थिरतेत तसेच सर्वसामान्य माणसाला अधिकार देणारी राज्यघटना करणाऱ्या या महामानवाने मंत्री म्हणून किती मोठे काम केले होते ते लक्षात येते. कामगारांना किमान वेतन, पगारी रजा आणि आठ तास काम ही रचना करणाऱ्या या महामानवाने इथल्या कामगारांवर केवढे उपकार केले आहेत याची जाणीव होते. प्रत्येक नेत्याचा आढावा घेताना प्रकरणाच्या सुरवातीलाच त्यांची महत्त्वाची कामे सांगणारा तक्ता, तसेच माहिती देताना वेगळी माहिती दिली आहे.

अर्थसंकल्प हिंदीतूनही सादर करण्याची सुरुवात अर्थंमंत्री सी. डी. देशमुख यांच्या काळापासून सुरू झाली हे कळते. तसेच विठ्ठलराव गाडगीळ यांच्या मंत्रिपदाच्या या काळात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून पुण्यातली टेलिफोन सेवा कशी सुधारली, हे लक्षात येते.

जनता दलाचे नेते मधु दंडवते, भाजपचे राम नाईक, नितीन गडकरी यांच्याही कामाचा सविस्तर वेध इथे घेतलेला आहे. महत्त्वाचे म्हणजे ‘नीरक्षीर’ पद्धतीने अर्थातच खरे काम काय आणि भावनात्मकदृष्ट्या सांगितल्या जाणाऱ्या गोष्टी म्हणजे पाणी यात विभाजन करून मराठी कर्तृत्वाचा आलेख इथे मांडला आहे. हा पहिला खंड आहे, याच्या दुसऱ्या भागात अन्य नेते व त्यांची माहिती येणार आहे हे लेखकाने स्पष्ट केलंय. पहिल्या भागातील माहितीमुळे लेखकाच्या दुसऱ्या भागाची उत्कंठा लागते इतकी दमदार माहिती या पुस्तकात आहे हे नक्की. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रस्तावना पुस्तकाचा हेतू व पुस्तक का वाचावे हे लक्षात आणून देईल.

  •  पुस्तक - महामुद्रा - दिल्लीतील मराठी कर्तृत्व - भाग-१

  • लेखक - धनंजय बिजले

  •  प्रकाशक - शुभम साहित्य, पुणे

  • किंमत - ४०० रुपये

  • पृष्ठे - ३३२

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com