
प्रश्नाला थेट भिडणं काय असतं हे प्रकाश देवळे यांनी आपल्या आमदारकीच्या काळात जिल्ह्यातल्या शिवसैनिकांना दाखवून दिलं होतं. आमदारही ते अपघातानेच झाले होते. ते एका सामान्य कुटुंबातून आलेले कार्यकर्ते. गुरुवारपेठेतल्या एका मोठ्या अशा भागीरथी बिल्डिंग इथं ते राहत होते. सामान्यपणे अकरावी झाली की, नोकरी शोधायची असा तो काळ. एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये त्यांनी नाव नोंदवलं. यथावकाश केंद्र सरकारच्या रक्षा मंत्रालय अंतर्गत असलेल्या सीडीए मध्ये क्लार्कची नोकरी लागली.
दरम्यानच्या काळात त्यांनी एका ऑर्केस्ट्रामधून हिंदी गाणी गायली. गायकीचा छंद जोपासला. पण हरहुन्नरी असलेल्या प्रकाशना तिथं देशपांडे आणि मोरे हे मित्र मिळाले. या तिघांनी मिळून व्यवसाय करायचा निर्णय घेतला. नोकरीला रामराम ठोकला. तिघांनी मिळून बांधकाम व्यवसाय सुरू केला. त्यात त्यांना चांगलं यश मिळालं. रक्षालेखा या नावानं त्यांनी धनकवडी, दत्तवाडी अन् अन्यत्र यशस्वी योजना करून दाखवल्या. त्यानंतर त्यांनी स्वतंत्र व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. तो त्यांनी यशस्वी करून दाखवला.
ते देशपांडे मोरे यांच्याप्रमाणेच तसे काँग्रेसचे कार्यकर्ते. काँग्रेस भवनातली इंदिरा गांधींची मूर्ती त्यांच्याच पुढाकाराने साकारली होती. त्यामुळं अनेक काँग्रेसी त्यांचे मित्र होते. छंद आणि नोकरीच्या दरम्यान त्यांची गाठ पडली ती सुशीलकुमार शिंदे यांचे साडू सुभाष विळेकर यांच्याशी मैत्री झाली. ते उत्तम व्हायोलीन वादक होते, त्यामुळं लगेचच त्यांचे सूर जुळले. त्यांच्यामुळे मग शिंदे यांच्याशी त्यांचा संबंध आला.
डॉ.सतीश देसाई हे त्यांचे जिवलग मित्र. त्यामुळं देसाईंच्या प्रत्येक उपक्रमात त्यांचा सहभाग असे. मग तो पुण्यभूषण पुरस्कार असो नाहीतर दिवाळी पहाटचा उपक्रम असो. प्रकाश तिथं मोठी जबाबदारी स्वीकारत असत. त्यांनी चित्रपट निर्मितीही केली. त्याचं दिग्दर्शन आणि संगीत दिलं. होतं. त्यांच्या शिवसेना प्रवेशाने पक्षात खळबळ उडाली. नंदू घाटे, काका वडके, शशिकांत सुतार असे दिग्गज शिवसेनेत होते.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना जिल्ह्याची जबाबदारी सोपवली. मग त्यांनी सारा जिल्हा ढवळून काढला. इथं काँग्रेस पक्षाचं प्राबल्य होतं. सहकार क्षेत्रावर त्यांचं वर्चस्व होतं. तरीही त्यांनी आपल्या सोबत शिवसैनिकांना घेऊन सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकीत धडक मारली. त्यांच्या त्यावेळचा झंझावात शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण करणारा ठरला.
इंदापूरचा सिनार मास प्रकल्प, दौंड, पुरंदर तसंच जुन्नर खेड आंबेगाव इथली आंदोलनं, निवडणूक प्रचार यानं कार्यकर्त्यांचं मोहोळ त्यांच्या मागं उभं राहिलं. त्यांना कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातून शिवसेनेने उमेदवारी दिली. मराठा माळी वाद असलेल्या या मतदारसंघात ते शिंपी समाजाचे असल्यानं त्यांची तिथं डाळ शिजली नाही. तिथून ते पराभूत झाले पण अनेक मित्र त्यांनी जमवले.
नशीब बलवान असेल तर काय होतं याचा प्रकाश देवळे ही ज्वलंत उदाहरण! कॅन्टोन्मेंट मतदार संघातून त्यांचा पराभव झाला तरी ते कार्यरत होते. त्याच वेळी राज्यात शिवसेना भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. विधानपरिषदेच्या निवडणुकीची गडबड सुरू होती. राज्यात सेना भाजपची सत्ता होती पण एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी ते सोडत नसत. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री होते. पक्षावर त्यांचच नियंत्रण होतं.
सरकारला अपक्ष आमदारांचं पाठबळ होतं. विधान परिषदेच्या निवडणुकीत अपक्षांच्यावतीनं विलासराव देशमुख यांना शिवसेनेच्या संमतिशिवाय निवडणुकीत उतरविण्याचा डाव टाकण्यात आला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत जोशींचा वरचष्मा असायचा.
विलासरावांना सोबत घेऊन जोशींची कोंडी करण्याचा मुंडे यांचा मनसुबा होता. विलासरावाचा अर्ज हर्षवर्धन पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एक तास शिल्लक असताना दाखल केला. शिवसेनाप्रमुखांना याची माहिती मिळाली. ते अस्वस्थ होते, मुंडे, भाजपने असं करायला नको होतं. त्याची कल्पना द्यायला हवी होती. बिनविरोध होऊ शकणारी निवडणूक मुंडेंच्या खेळीने मतदान करावं लागणार होतं. विमनस्क अवस्थेत शिवसेनाप्रमुख असतानाच त्यांचा फोन वाजला.
साहेब, मी प्रकाश देवळे बोलतोय....कामानिमित्त मी मंत्रालयात आलोय, तुम्हाला भेटायला यायचंय येऊ का हे विचारण्यासाठी फोन केलाय...! शिवसेनाप्रमुखांच्या डोक्यात वेगळंच आलं. त्यांनी प्रकाश देवळे यांना तिथं कुठे आहेस हे विचारून तिथंच थांबायला सांगितलं. विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचा असेल अन् मुंबईतून कुणाला पाठवायचं म्हटलं तरी अर्ज दाखल करण्याची वेळ संपणारी होती. तेवढा अवधी शिल्लक नव्हता. ताबडतोब मग शिवसेनाप्रमुखांनी मुख्यमंत्री मनोहर जोशींना फोन लावला. चौकशी केली की, तिथं शिवसेना आमदार आहेत का? जोशींना काही अर्थबोध होत नव्हता.
शिवसेनाप्रमुखांनी तिथं उपस्थित असलेल्या आमदारांना घेऊन विधानपरिषदेसाठी प्रकाश देवळे यांचा अर्ज भरा असा आदेश दिला. सारे धावत पळत गेले. अर्ज दाखल करण्यासाठी थोडासा अवधी शिल्लक होता. अन् देवळेंचा अर्ज दाखल झाला. जोशींना मुंडेंची खेळी लक्षात आली होती. त्या निवडणुकीत पसंतीनुसार मतदान होतं. मतदानानंतर देवळे हे अखेरच्या फेरीत अवघ्या अर्ध्या मतांनी विजयी झाले तर विलासराव देशमुख पराभूत झाले. पण ते तेव्हा विजयी झाले असते तर मात्र काँग्रेसकडून मुख्यमंत्री होऊ शकले नसते. देवळेंच्या नशिबात आमदारकी होती, म्हणूनच साईभक्त प्रकाश देवळांना आमदारकीचा अचानक लाभ झाला. मग त्यांनी शिरगावला प्रति शिर्डी उभारली. अन् आपल्या आयुष्याचा अखेरचा काळ तिथं व्यतीत केला.
'कलायात्री शिक्षण संस्था' स्थापन करून हजारो भटक्या-विमुक्त विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे त्यांचे कार्य हे त्यांचे सामाजिक भान दर्शवते. अलीकडेच त्यांना नामदेव शिंपी समाजाचा 'समाज भूषण पुरस्कार' मिळाला होता, जो त्यांच्या कार्याची योग्य पावती होती. त्यांच्या निधनाने त्यांच्या पत्नी, दोन मुली, जावई आणि नातवंडे यांच्यासह संपूर्ण समाज एका आधारवडला मुकला आहे. देवळे साहेबांचे व्यक्तिमत्त्व हे साधे, सरळ आणि जनसामान्यांसाठी नेहमी उपलब्ध होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते अत्यंत निकटवर्ती व विश्वासू होते
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.