CJP News: 'अभिजीत दीपके, दास अन् रांका यांचं राजकीय करिअर संपलं, सीजेपी संपली..'; सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांचं मोठं विधान

Cocroach Janata Party : माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत कॉक्रोच जनता पार्टी,तसेच अभिजीत दिपके,सौरव दास, आशुतोष रांका यांच्या राजकीय कारकीर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
Markandey Katju On CJP Leaders
Markandey Katju On CJP Leaders Sarkarnama
Published on: 
Updated on: 

New Delhi News: सोशल मीडियाच्या माध्यमातून देशभरात डिजिटल चळवळ उभी करण्यात अभिजीत दिपके यांच्या कॉक्रोच जनता पार्टीला मोठं यश मिळालं. सीजेपीच्या आंदोलनाची गंभीर दखल घेत मोदी सरकारमधील मंत्र्‍यालाही राजीनामा द्यावा लागला. मात्र,नंतर कॉक्रोच जनता पार्टीनं पुकारलेले जंतर मंतरवरील ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील आंदोलन, तसेच तिरंगा रॅली असे काही आंदोलनं दिपकेंसह त्यांच्या इतर नेत्यांच्या अटकेमुळे गुंडाळण्यात आली. मात्र,आता सीजेपीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या माजी सरन्यायाधीशांनी मोठं विधान केलं आहे.

माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत कॉक्रोच जनता पार्टी,तसेच अभिजीत दिपके,सौरव दास, आशुतोष रांका यांच्या राजकीय कारकीर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सीजेपीच्या नेत्यांनी पीस बॉन्डवर (शांतता करार) स्वाक्षरी करून स्वतःची राजकीय कारकीर्द संपवली आहे,असे काटजू यांनी म्हटले आहे. आता त्यांनी या कराराचे उल्लंघन करून आंदोलन केले,तर त्यांना तुरुंगात जावे लागू शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

सौरव दास आणि आशुतोष रांका हे आतापर्यंत केवळ एका आठवड्यासाठी तुरुंगात गेले होते. मात्र, आता त्यांनी पुन्हा आंदोलन केले, तर पोलिस त्यांना दीर्घकाळासाठी तुरुंगात पाठवू शकतात. त्यामुळेच ते आंदोलन करण्यास घाबरत असल्याचे काटजू यांनी म्हटले आहे. निवृत्तीनंतर आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या काटजू यांनी सीजेपीच्या नेत्यांनी पीस बॉन्डवर स्वाक्षरी करण्याची तुलना 'माफीनाम्या'शी केली आहे.

माजी न्यायमूर्ती काटजू यांनी यावेळी "सीजेपीच्या नेत्यांची प्रतिमा आता पळपुट्यांसारखी झाली आहे. पीस बॉन्डवर स्वाक्षरी केल्यामुळे आता जनता त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही. ज्यांनी पीस बॉन्डवर स्वाक्षरी केली, त्यांची कारकीर्द संपल्याचा हल्लाबोल त्यांनी सीजेपीच्या प्रमुख नेत्यांवर केला आहे. जनतेचा त्यांच्यावरील विश्वास उडाला असल्याचंही ते म्हणाले.

पीस बॉन्डची तुलना माफीनाम्याशी करताना काटजू म्हणाले, "ब्रिटिशांच्या काळात ज्या क्रांतिकारकांना अटक केली जायची, त्यांना माफी मागितल्यास सोडून देण्याचे आश्वासन दिले जायचे. अन्यथा काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी तुरुंगात सडावे लागायचे. जे क्रांतिकारक माफीनामा लिहून द्यायचे, त्यांची कारकीर्द संपायची. अशा लोकांवर जनता पुन्हा कधी विश्वास ठेवणार का?" असा सवालही काटजू यांनी दिपके, दास आणि रांका या सीजेपीच्या नेत्यांविषयी उपस्थित केला आहे.

आता अनेक महिने तुरुंगात जावे लागेल : मार्कंडेय काटजू

काटजू पुढे म्हणाले, "पीस बॉन्डचा अर्थ काय? याचा अर्थ तुम्ही लेखी स्वरूपात असे आश्वासन दिले आहे की, यापुढे कधीही आंदोलन करणार नाही. कारण तुम्ही आंदोलन केले, तर पोलीस तुम्ही शांतता भंग करत असल्याचा आरोप करतील. तुम्ही पीस बॉन्डचे उल्लंघन केले, तर तुम्हाला तुरुंगात टाकले जाईल आणि यावेळी दीर्घकाळासाठी तुरुंगात राहावे लागण्याची शक्यताही माजी सरन्यायाधीशांनी व्यक्त केली आहे.

"सौरभ दास आणि आशुतोष रांका हे आतापर्यंत केवळ एका आठवड्यासाठी तुरुंगात होते. मात्र, आता त्यांनी पुन्हा आंदोलन केले, तर त्यांना अनेक महिन्यांसाठी तुरुंगात जावे लागू शकते. आता या लोकांना तुरुंगात जाण्याची भीती वाटत आहे. त्यामुळे सीजेपी आता संपली आहे. त्यांचा खेळ संपला आहे. पीस बॉन्डवर स्वाक्षरी करून त्यांनी स्वतःचा कणाच मोडून घेतला आहे," अशी टीकाही काटजू यांनी केली.

सर्वसामान्यांचं जीवनमान उंचावणार का?

राजकारणातील प्रत्येक निर्णयाचे एकच निकष असायला हवेत. तो निर्णय घेतल्यामुळे सर्वसामान्य लोकांचे जीवनमान उंचावणार आहे का, असा सवाल मार्कंडेय काटजू यांनी उपस्थित केला.तसेच "सुरुवातीला सीजेपीनं धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यावेळी मी त्यांना सांगितले होते की, एक शिक्षणमंत्री जाईल आणि दुसरा येईल. त्याने काय फरक पडणार आहे? त्यामुळे लोकांचे जीवनमान सुधारणार आहे का?"

मार्कंडेय काटजू म्हणाले,"सीजेपीच्या नेत्यांनी त्यावेळी मला पेपरफुटी होत असल्यामुळे आम्ही शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहोत, असं त्यांचं म्हणणे होते. मात्र, मी त्यांना पेपरफुटीचे मूळ कारण भ्रष्टाचार आहे. या व्यवस्थेतून भ्रष्टाचार संपणार नाही. तुम्ही धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवले आणि त्यासाठी कायदाही केला, तरीही पेपरफुटीच्या घटना घडतच राहतील. जोपर्यंत भ्रष्टाचार कायम आहे, तोपर्यंत हे प्रकार सुरूच राहणार आहेत."

आता सीजेपीकडून सध्या ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. पण एकजण त्या पदावरून जाईल आणि दुसरा त्या जागी येईल. पण त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे जीवनमान उंचावणार आहे का?" असा सवालही त्यांनी कॉक्रोच जनता पार्टीसह विरोधकांना केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.