Mizoram Assembly Election Result 2023 : देशातील कोणत्याही राज्याची निवडणूक असो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय भाजपचा प्रचार अशक्यच. मागील नऊ वर्षात झालेल्या विधानसभेच्या बहुतेक निवडणुकांमध्ये पंतप्रधान मोदींची जादू चालली. एक अकेला सब पे भारी, मोदी है तो मुमकीन है...या घोषणा जणू ट्रेडमार्क बनल्या. पण त्याला अपवाद ठरला तो मिझोरमचा. या राज्याच्या निवडणुकीत 40 पैकी 23 जागांवर उमेदवार असूनही मोदींची एकही सभा झाली नाही. निकालात पक्षाला केवळ दोनच जागा मिळाल्याने मोदी प्रचाराला का गेले नाहीत, यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत.
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा पाडाव झाला. मोदींचा (PM Narendra Modi) करिष्मा आणि स्थानिक नेत्यांचे परिश्रम भाजपच्या कामी आले. मोदींनी मध्य प्रदेशात 14 सभा आणि एक रोड शो, राजस्थानमध्ये 12 सभा, तेलंगणात आठ सभा आणि एक रोड शो तर छत्तीसगडमध्ये सहा सभा घेतल्या. या राज्यांसोबत मिझोरम मध्येही निवडणूक पार पडली. पण या राज्यांत प्रचाराला जाणे मोदींनी टाळले.
निवडणूक जाहीर झाल्यानंतर मिझोरममध्ये मोदींची पहिली सभा 30 ऑक्टोबर रोजी निश्चित झाली होती. पण अचानक हा दौरा रद्द करण्यात आला. पक्षाकडून त्यासाठी कोणतेही कारण देण्यात आले नाही. या राज्यात भाजपने 23 जागा लढवल्या. सोमवारी निकाल हाती आल्यानंतर मागील निवडणुकीच्या तुलनेत केवळ एका जागेची भर पडली असून पक्षाला दोनच जागांवर समाधान मानावे लागले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मोदींच्या सभा झाल्या असता तर मिझोराममध्ये भाजपला फायदा झाला असता किंवा नाही, यापेक्षा आता त्यांचा प्रचार दौरा रद्द झाल्याचीच चर्चा अधिक होत आहे. विरोधकांकडून मणिपूरमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मोदींनी प्रचार न केल्याचा दावा करण्यात आला होता. मणिपूर हिंसाचाराचे पडसाद देशभरात उमटले. इतर देशांमध्ये मानवी हक्क संघटनांकडूनही त्याची दखल घेण्यात आली. त्यानंतर मोदींनी या राज्यात एकदाही पाऊल ठेवले नाही, अशी टाकी विरोधकांकडून सातत्याने केली जाते. विरोधकांनी त्यावरून देशभर रान उठवले होते.
मणिपूरमध्ये न जाता प्रचारासाठी पंतप्रधान मोदी मिझोरममध्ये आले, असा चुकीचा संदेश ईशान्यकडील राज्यांमध्ये जाऊ नये, या उद्देशानेच सभा न घेण्याचा निर्णय घ्यावा लागल्याची चर्चा आहे. भाजपची या राज्यात फारशी ताकद नाही. सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट हा पक्ष एनडीएमध्ये असला तरी यावेळी निवडणूक एनडीएने एकत्रित लढविली नाही.
भाजपला सर्व जागांवर उमेदवारही देता आले नाहीत. पक्षाला निवडणुकीत यश मिळणार नाही, याची जाणीव स्थानिक नेत्यांसह वरिष्ठांनाही झाली असावी. तसे झालेही आणि पक्षाला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. मणिपूरची धग आणि पराभवाच्या जाणीवेमुळेच मोदींना प्रचारात न उतरवता इतर नेत्यांवर जबाबदारी दिल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
(Edited By - Rajanand More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.