Muhammad Yunus : जगात 2050 पर्यंत एकही व्यक्ती गरीब राहू नये! दारिद्र्यमुक्तीचा ध्यास घेतलेला कार्यकर्ता...

Poverty Eradication : डॉ. महंमद युनूस यांनी मायक्रोफायनान्स आणि ग्रामीण बँकद्वारे लाखो कुटुंबांना गरिबीतून बाहेर काढले. दारिद्र्यमुक्त जग निर्माण करण्याच्या त्यांच्या ध्यासाची प्रेरणादायी कथा या पुस्तकातून उलगडते.
Muhammad Yunus
Muhammad YunusSarkarnama
Published on
Updated on

सुरेंद्र पाटसकर

Microfinance Yunus book : सुमारे 40 वर्षांपूर्वी डॉ. महंमद युनूस यांनी बांगलादेशातील गरीब होतकरू व्यक्तींना कच्चा माल खरेदी करण्यासाठी स्वतःच्या खिशातून उचल दिली. त्यातूनच मायक्रो-फायनान्स संकल्पनेचा उदय झाला. पुढे गरिबांना छोटी कर्जे देण्यासाठी डॉ. युनूस यांनी ग्रामीण बँकेची स्थापना केली आणि त्याद्वारे बांगलादेशातील हजारो कुटुंबीयांचे दारिद्र्य दूर करण्यास हातभार लावला. या प्रयोगाचे जगभरात अनुकरण करण्यात आले. प्राध्यापक ते दारिद्र्यमुक्तीचा दूत असा त्यांचा प्रवास झाला. या प्रवासातील टप्पे म्हणजे त्यांचे आत्मचरित्रच. डॉ. युनूस यांनीच या सर्व गोष्टी शब्दबद्ध केल्या आहेत.

डॉ. युनूस यांच्यावर बालपणी त्यांच्या अम्मीचा अर्थात आईचा प्रभाव होता. गावाकडून कुणी गरीब नातलग आले तर त्यांना देण्यासाठी म्हणून त्यांची अम्मी काही पैसे बाजूला काढून ठेवायची. घरातील कामाबरोबरच ती वडिलांच्या बरोबरीने दागिन्यांचेही काम करायची. या कामातून मिळणारे पैसे ती गरीब नातलग, मित्र, शेजारी यांना अडीनडीला देण्यासाठी राखून ठेवायची.

डॉ. युनूस यांच्यावर आईच्या विचारांचा मोठा पगडा होता. वडिलांच्या विचारांचाही त्यांच्यावर प्रभाव होता. भारताची फाळणी आणि बांगलादेशाची निर्मिती या दोन्ही घटना त्यांनी बघितल्या. त्यावेळची सामाजिक व आर्थिक स्थिती त्यांनी अनुभवली. बालपणीच्या सर्व कालखंडाचे वर्णन डॉ. युनूस यांनी पुस्तकात केले आहे.

त्यांच्या जडणघडणीतील दुसरा टप्पा होता तो चितगाँगमधील महाविद्यालयातील शिक्षकाची नोकरी केली तो. त्याच कालखंडात त्यांनी स्वतःचा व्यवसायही करून पाहिला. त्यावेळी खोकी आणि सामान बांधण्याचे साहित्य तत्कालीन पश्चिम पाकिस्तानातून आणावे लागे. त्यामुळे त्यांनी पॅकेजिंग आणि प्रिंटिंगचा व्यवसाय सुरू केला. लहान - मोठी खोकी, विविध आवरणे, पुस्तके यांची निर्मिती त्यांनी केली.

व्यावसायिक यश मिळाल्यानंतरही त्यांनी फुलब्राईट शिष्यवृत्ती मिळविली आणि ते 1965 मध्ये अमेरिकेमध्ये बाऊल्डरमधील कोलोरॅडो विद्यापीठात पीएचडीसाठी प्रवेश घेतला. अमेरिकेमधील मोकळे वातावरण, तेथील संस्कृती, खाद्यसंस्कृती आदींचे अनुभवही त्यांनी लिहिले आहेत. डॉ. युनूस शिक्षणासाठी अमेरिकेत असतानाच व्हिएतनामचे युद्ध सुरू झाले होते. त्यावेळी त्यांनी युद्धविरोधी मोर्चात भाग घेतला होता.

Muhammad Yunus
Nightclub Fire : नाईट क्लबमध्ये मृत्यूचा तांडव, 23 जणांनी गमावला जीव; मध्यरात्री नेमकं काय घडलं? पंतप्रधान मोदींनी घेतली दखल

प्रा. निकोलस रोगोन यांच्या हाताखाली शिकण्याची संधी त्यांना मिळाली. त्यांनी अर्थशास्त्राचे धडे सोप्या शब्दांत त्यांना दिले. त्यांनी शिकविलेल्या अर्थशास्त्राच्या सिद्धांतांमुळेच पुढे ग्रामीण बॅंकेची उभारणी करणे शक्य झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. बांगलादेश मुक्तिसंग्रामाच्या वेळी अमेरिकेत राहून केलेल्या कामाचे सविस्तर वर्णनही युनूस यांनी केले आहे.

बांगलादेश लीग ऑफ अमेरिका, तसेच बांगलादेश डिफेन्स लीग या दोन संघटना अमेरिकेत स्थापन करण्यात आल्या. त्यात युनूस यांचा वाटा मोठा होता. 16 डिसेंबर 1971 रोजी बांगलादेशाची निर्मिती झाल्यानंतर काही महिन्यांतच युनूस बांगलादेशाला परतले. तिथे त्यांनी नियोजन आयोगात काम करण्यास सुरुवात केली. पण या कामात ते रमले नाहीत.

Muhammad Yunus
flight Cancellation Crisis : विमान वाहतूक विस्कळीत, 'इंडिगो'वर कारवाई होणार..., मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्टच सांगितले

त्यांनी ते काम सोडले. चितगाँग विद्यापीठात अर्थशास्त्रविभागाच्या प्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारली. ही नोकरी करत असतानाच त्यांनी जोबरा या गावात शेतीविषयक प्रयोग केले. देशातील अन्नधान्याचे उत्पादन वाढावे, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. या कारणीभूत होता तो 1974 मधील देशभरातील दुष्काळ. या प्रयत्नांतूनच जोबरामध्ये पडीक जमिनीवर पिके घेण्याचा त्याचा प्रयत्न यशस्वी झाला. त्यात त्यांचे वैयक्तिक नुकसान झाले, पण नव्या प्रयोगाची बीजे त्यात पेरली गेली. जोबरा गावातील 42 जणांना स्वतःच्या खिशातून 856 टका म्हणजे 27 डॉलरपेक्षाही कमी रक्कम कर्जाऊ देण्यात गरिबांसाठीच्या बँकेची बीजे पेरली गेली

त्यातूनच बँकेचा पथदर्शी प्रकल्प साकारला. पुढच्या टप्प्यात महिलांनी ग्रामीण बँकेतून कर्ज घ्यावे यासाठी केलेले प्रयत्न याचे सविस्तर वर्णन युनूस केले आहे. जोबरानंतर तंगैलमध्ये ग्रामीण बँकेचा विस्तार करण्यात आला. जोबरामध्ये आणि इतर भागात काम करताना प्रत्येक वेळी नवा अनुभव युनूस यांना येत होता.

ग्रामीण बँकेच्या धर्तीवर ज्यांनी सुरुवातीला योजना आणल्या, त्यांच्यासोबत युनूस यांनी चर्चा केली. आर्थिक पाठबळ मिळवणे त्या सर्वांना अवघड जात होते. प्रशिक्षणासाठी बांगलादेशात येणे, योजना सुरू करणे आणि नंतर प्रायोगिक तत्त्वावरील योजनेचा विस्तार करणे यासाठी निधीची गरज होती. या अडचणी सोडविण्यात युनूस यांनी कशी मदत केली, अमेरिकेतील वास्तव्यात त्यांनी निधी कसा गोळा केला, हे मुळातून वाचणे रंजक आहे.

बांगलादेशाच्या (Bangladesh) बाहेर ग्रामीण बँकेसारखी योजना चालू शकेल याची खात्री एकेकाळी युनूस यांना नव्हती. तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी मोठा टप्पा गाठला आहे. वेगवेगळ्या संस्कृती, हवामान आणि वेगवेगळ्या पातळ्यांवरील विकास असणाऱ्या देशांमध्ये डझनभरांहून अधिक योजना सुरू आहेत. लघुकर्जपद्धत किती बहुढंगी असू असते हेच त्यावरून समजते. लघुकर्ज म्हणजे जादूची कांडी नाही. यामुळे एका फटक्यात जगातील गरिबी नष्ट होणार नाही. पण यामुळे अनेकांची गरिबीची तीव्रता कमी होऊ शकते.

Muhammad Yunus
Aryan Khan controversy : शाहरुख खान पुत्राचे आक्षेपार्ह हावभाव; पोलिसाकडून चौकशी सुरू, सीसीटीव्ही फुटेज जप्त

जग गरिबीमुक्त करण्यासाठीचे हे एक पाऊल आहे, असा विश्वास डॉ. युनूस यांनी व्यक्त केला आहे. जगात 2050 पर्यंत एकही गरीब व्यक्ती राहू नये, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. या सर्व लिखाणातून युनूस यांची काम करण्याची पद्धती, त्यांचे विचार सुस्पष्टपणे पोहोचत आहेत.

  •   पुस्तकाचे नाव : मी गरिबांचा बँकर

  • प्रकाशक : समकालीन प्रकाशन

  •   लेखक : महंमद युनूस

  •   अनुवाद : अमृता दुर्वे

  •   पृष्ठे : 247

  •   मूल्य : 300 रुपये.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com