

TDP MP from Nandyal : दिवंगत माजी राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी, दिवंगत माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी लोकसभेत प्रतिनिधित्व केलेल्या नंद्याळ या हायप्रोफाइल लोकसभा मतदारसंघाच्या सध्याच्या खासदार आहेत तेलुगू देसम पक्षाच्या डॉ. बायरेड्डी शबरी. या लोकसभेत अनेक उच्चविद्याविभूषित लोकप्रतिनिधी निवडून गेले आहेत, ही समाधानाची बाब. या खासदारांना राजकीय पार्श्वभूमी असली तरी त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने सभागृह गाजवून आपली अमीट छाप जनमानसांवर व आपल्या मतदारांवर सोडावी, अशी अपेक्षा असते. ती बायरेड्डी शबरी यांनीही पूर्ण करावी, अशी अपेक्षा.
देशाच्या राजकारणात दक्षिणेतील राजकारणाने आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. काँग्रेसच्या बिहार, उत्तर प्रदेशातल्या पराभवाची चर्चा जास्त प्रमाणात राजकीय विश्वात होत असली तरी दक्षिणेतून काँग्रेसच्या उच्चाटनाची चर्चा क्वचितच होत असते. दक्षिणेतील तमिळनाडू, आंध्र प्रदेश या राज्यात काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष म्हणून देखील अस्तित्वात नाही.
आंध्र प्रदेशाचे विभाजन आंध्र व तेलंगण अशा दोन राज्यात केलेल्या काँग्रेसला स्थापनेनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत या दोन्ही राज्यांत पराभव पत्करावा लागला. आता तेलंगणात काँग्रेसचे सरकार असले तरी आंध्र प्रदेशात मात्र राज्यस्थापनेनंतर स्थानिक तेलुगू देसम पक्ष व वायएसआर (युवाजन श्रमिक रयतू) काँग्रेसचेच सरकार गेल्या तीन निवडणुकीत आलटून पालटून आलेले आहे. एन चंद्रबाबू नायडू मुख्यमंत्री व पक्षनेते असलेल्या तेलुगू देसम पक्षाच्या नंद्याळ येथील खासदार आहेत डॉ.बायरेड्डी शबरी.
वयाच्या 41 व्या वर्षी त्यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक 1,11,975 इतक्या मताधिक्क्याने जिंकली. त्यांना सात लाख मते पडली. त्यांनी वायएसआर काँग्रेसचे विद्यमान खासदार पी ब्रह्मानंद रेड्डी यांचा पराभव केला. काँग्रेसचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिला. टीडीपी अर्थात तेलुगू देसम पक्षाचे दोन वेळा आमदार व कॅबिनेट मंत्री असलेल्या बी राजशेखर रेड्डी यांच्या शबरी या कन्या आहेत.
तर त्यांचे आजोबा बी शेषसायन्ना रेड्डी हेही तीन वेळा आमदार व एकवेळा विधानपरिषदेचे सदस्य राहिले आहेत. वडील राजशेखर यांनी स्वतंत्र रायलसीमा परिरक्षण समितीच्या माध्यमातून स्वतंत्र रायलसीमा राज्याची मागणी लावून धरली होती. त्यासाठी त्यांनी ट्रॅक्टर मार्चही काढला होता.
शबरी या उच्चविद्याविभूषित असून त्यांची एमबीबीएस पदवी नारायण वैद्यकीय महाविद्यालयातून तर एमडी पदवी एनटीआर महाविद्यालयातून झाली. त्यांचे पती शिवचरण रेड्डीही डॉक्टर आहेत. संविधानास 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने त्यांनी संसदेत केलेल्या भाषणाची चर्चा झाली होती. आॅटोवाला सीएम, चायवाला पंतप्रधान व आदिवासी राष्ट्रपती, ही या देशाच्या संविधानाची ताकद असल्याचे त्या म्हणाल्या होत्या. आंध्र प्रदेशातील बेडा बुडगा जंगम या भटक्या विमुक्त जातीला अनुसूचित जातींचा दर्जा मिळावा, ही मागणीही त्यांनी संसदेत लावून धरली आहे.
नंद्याळ मतदारसंघ 1952 म्हणजे पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत अस्तित्वात आला. आतापर्यंत 19खासदार या मतदारसंघाने निवडून दिले. त्यात दहा वेळा काँग्रेस, सहा वेळा तेलुगू देसम पक्ष, (TDP) तर प्रत्येकी एकवेळ वायएसआर काँग्रेस, भारतीय लोकदल व अपक्षांनी जिंकली. माजी राष्ट्रपती दिवंगत नीलम संजीव रेड्डी हे 1977 ला भारतीय लोकदलाकडून तर माजी पंतप्रधान दिवंगत पी व्ही नरसिंहराव हे 1991 साली निवडून आले. नरसिंहराव पंतप्रधान यांनी आपले प्रतिस्पर्धी बंगारू लक्ष्मण यांच्यावर तब्बल पाच लाख 80,297 मतांनी पराभव केला होता. त्यांना 90 टक्के मते पडली होती. दहावेळा जिंकलेल्या काँग्रेसची अवस्था सध्या मात्र अतिशय नाजूक झाली आहे.
आंध्र प्रदेशच्या रायलसीमा भागातील नंद्याळ हे ऐतिहासिक शहर आहे. मंदिरांचे घर अर्थात ‘नवा नंदी’ मंदिरांनी या परिसराची ओळख बनली आहे. या शहरात तब्बल नऊ मंदिरे आहेत. विजयनगर साम्राज्यापासून ही ओळख निर्माण झाली आहे. याशिवाय उद्योग व शेतीसाठीही हा भाग ओळखला जातो. त्याशिवाय ऐतिहासिक अशा बेलुम केव्हज इथे आहेत. जैन व बौद्ध लेणी इथे प्रामुख्याने आढळल्या आहेत. 14 व्या शतकात इथे नंदनमहाराज हे राजे होऊन गेल्याचा इतिहास आहे. या सर्व इतिहासामुळे या परिसराला नंद्याळ हे नाव पडल्याचे समजले जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.