Patna News: केंद्रीय मंत्री आण लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान हे मंत्रिपदाच्या राजीनाम्याची भाषा बोलू लागले आहेत. एनडीए सरकारच्या काही निर्णयांवर उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर आता पासवान यांनी सूचक इशारा दिल्याचे मानले जात आहे. यामागचे कारणही त्यांनी सांगितले.
पटना येथे एका कार्यक्रमात बोलताना चिराग यांनी हे विधान केले आहे. ते म्हणाले, मी कोणत्याही आघाडीमध्ये असेन किंवा कोणत्ही मंत्रिपदावर, पण ज्यादिवशी संविधान आणि आरक्षणासोबत छेडछाड होत असल्याचे मला वाटेल, त्याचदिवशी मी माझ्या वडिलांप्रमाणे मंत्रिपदाला लाथ मारेन.
चिराग यांच्या विधानाचे अनेक अर्थ काढले जात आहे. राजीनाम्याची भाषा करण्याआधी ते म्हणाले, ‘आरक्षणप्रकरणी कोर्टाने कायद्यात बदल करण्याबाबत भाष्य केले होते. त्याचा विरोध वडिलांनी केला होता. त्यावेळीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे ऐकले. त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे.’
चिराग पासवान हे मंत्री झाल्यापासून त्यांच्या विधानांमुळे सातत्याने चर्चेत आहेत. आपले म्हणणे ते उघडपणे मांडताना दिसत आहे. आरक्षणसाठी विविध संघटनांनी जाहीर केलेल्या भारत बंदला त्यांनी जाहीर पाठिंबा दिला होता. यूपीएससीच्या लॅटरल भरतीलाही त्यांनी विरोध केला होता. वक्फ बोर्डाच्या सुधारित विधेयकाच्या चर्चेतून त्यांच्या खासदारांनी संसदेतून काढता पाय घेतला होता.
बिहारमध्ये नितीश कुमार आणि चिराग पासवास यांच्यातही फारसे सख्य नाही. 2020 च्या विधानसभा निवडणुकीवेळी चिराग एनडीएतून बाहेर पडत स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे गेले होते.
लोकसभा निवडणुकीआधी ते पुन्हा एनडीएत आले. झारखंडमध्ये त्यांच्या पक्षाला एनडीएमध्ये घेण्यात आलेले नाही. याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे चिराग यांच्या भूमिकांबाबत सातत्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.
दरम्यान, चिराग यांनी थेट राजीनाम्याबाबत भाष्य करून एकप्रकारे सरकारला सूचक इशारा दिल्याचे मानले जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपच्या काही खासदारांनी संविधान बदलाची भाषा केली होती.
अनेक मतदारसंघात एनडीएला त्याचा फटका बसला. चिराग यांचा त्याकडे रोख असू शकतो. आता बिहार, झारखंडसह अन्य काही राज्यांत विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यासाठीही असे विधान करून आपली व्होट बँक शाबूत ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचेही मानले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.