
Panaji News : गोव्यात सध्या नव्या वर्षात भाजपमध्ये अनेक बदल होण्याची शक्यता आहे. सध्या प्रदेशाध्यक्ष बदलाचे वारे वाहत असून इतर संघटनात्मक बदल देखील होण्याच्या चर्चांना उत आला आहे. यादरम्यान मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि माजी मंत्री तथा आमदार नीलेश काब्राल यांच्यात शित युद्ध रंगले आहे. काहीच दिवसांपूर्वी काब्राल यांनी मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावरून भाष्य करताना सरकारवर टीका केली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या आमदारांनी तंबी केली आहे. तर याच तंबीवरून काब्राल यांनी पुन्हा एकदा प्रमोद सावंत यांना लक्ष केलं आहे.
गोव्यात विधानसभा निवडणुका पुढच्या दोन वर्षात लागणार आहेत. यादरम्यान भाजपमध्ये आंतरर्गत बदल करण्यात येत आहेत. तर आंतरर्गत वाद देखील आता चव्हाट्यावर येत आहेत. सध्या मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि माजी मंत्री तथा आमदार नीलेश काब्राल यांच्यात कलगितूरा रंगला असून मुख्यमंत्र्यांनी थेट तंबीच केल्याने गोव्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापण्यास सुरूवात झाली आहे.
माजी मंत्री तथा आमदार काब्राल यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाची आठवन करून दिली होती. त्यावेळी त्यांनी इस्पितळातील काही सुविधांवरून आपल्याच सरकारला घरचा आहेर देत टीका केली होती. यानंतर गोव्याच्या भाजपमध्ये नेमकं चाललयं तरी काय अशी विचारणा गोमंतीय करताना दिसत होते.
यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पक्षाच्या आमदारांना तंबी देत सार्वजनिकरीत्या नकारात्मक विधाने करू नका अशा सूचना केल्या होत्या. यावरून आता काब्राल यांनी आपण स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी आपण कोणावर टीका केली नसून फक्त मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिल्याचे म्हटले आहे.
तर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पक्षातील आमदारांना सार्वजनिक चर्चा करू नका. नकारात्मक विधाने टाळा असे आवाहन केले होते. तसेच त्यांनी कोणतेही प्रश्न किंवा समस्या असतील तर पक्षाच्या अंतर्गत चर्चेत सोडवण्यास सांगितले होते.
यावरून काब्राल यांनी, आपण सरकारवर टीका केलेली नाही. मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याचा प्रश्नच येत नाही. माझा २०१३-१४ पासून सुरू असलेल्या प्रकल्पांवर अजूनही पाठपुरावा सुरू आहे. हे आमचे मुख्यमंत्री असून सरकारही आमचेचं असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी नव्या प्रदेशाध्यक्ष निवडीसह जिल्हाध्यक्ष निवडणुकांच्या बाबत माहिती दिली. यावेळी तानावडे यांनी, पक्षाच्या जिल्हाध्यक्ष निवडणुका शुक्रवारी (ता.10) होणार असून 11 जानेवारीला यांचा निकाल जाहीर होईल. यानंतरच प्रदेशाध्यक्षांची निवड प्रक्रिया सुरू केली जाईल, असेही ते म्हणाले.