

New Delhi News: विरोधकांच्या इंडिया आघाडीनं मोठ्या विश्वासानं लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात मांडलेला अविश्वास ठरावाचा फुगा फुटला आहे. बुधवारी(ता.11 मार्च) आवाजी मतदानानं नामंजूर करण्यात आला आहे. हा विरोधकांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात मांडलेल्या अविश्वास ठरावावर संसदेच्या सभागृहात दोन दिवस चर्चा झाली. विरोधकांकडून लोकसभा अध्यक्षांवर पूर्वग्रहदूषित वागणूक आणि विरोधी सदस्यांचे निलंबन केल्याचा ठपका ठेवत हा अविश्वास ठराव मांडण्यात आला होता. या चर्चेनंतर आवाजी मतदान घेण्यात आलं. यात लोकसभाध्यक्षांविरोधातील अविश्वास ठराव नामंजूर करण्यात आला. यावेळी विरोधकांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे सभागृहाचं आजचं कामकाज तहकूब करण्यात आलं.
विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव फेटाळल्यानंतर आता लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला हेच राहणार असल्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. सत्ताधारी भाजप आणि एनडीएच्या मित्रपक्षांनी या प्रस्तावाला कडाडून विरोध दर्शविला होता. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरुद्धच्या अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा देण्याचा निर्णय तृणमूल काँग्रेसनं घेतल्यानं विरोधकांना मोठं बळ मिळालं होतं.
लोकसभेच्या सभागृहात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर विरोधी नेत्यांना बोलू न दिल्याबद्दल व 8 विरोधी खासदारांना निलंबित करण्यात आल्यानंतर बिर्ला यांना पदावरून हटवण्यासाठी 118 विरोधी सदस्यांनी सूचना सादर केली होती.
याचदरम्यान, ओम बिर्ला यांनीही विरोधकांच्या अविश्वास ठरावाचा प्रस्ताव मांडण्यासाठी हालचाली सुरू केल्यावर सभागृहात कामकाजाचं अध्यक्षपद भूषवणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. तसेच ते लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीऐवजी सदस्यांमध्ये बसल्याचं दिसून आलं होतं. असा दुर्मिळ क्षण असेल.
यापूर्वी लोकसभेच्या तीन सभापतींना अविश्वास प्रस्तावांना सामोरे जावे लागले होते. यात जी.व्ही. मावळणकर (1954), हुकम सिंग (1966) आणि बलराम जाखड (1987) यांचा समावेश आहे. हुकुम सिंग, मावळणकर, जाखड यांच्याविरुद्धचे प्रस्ताव फेटाळले गेले. कारण त्यांना 50 सदस्यांचा आवश्यक पाठिंबा किंवा सभागृहाचा पाठिंबा मिळाला नाही. हे प्रस्ताव नियमांनुसार आवश्यक संख्येत समर्थक नसल्याने किंवा राजकीय सहमती नसल्याने फेटाळून लावण्यात आले होते.
आता एनडीएच्या सरकारच्या तिसऱ्या टर्ममध्ये लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावरही विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाण्याची नामुष्की ओढावली होती. बिर्ला हे चौथे लोकसभा अध्यक्ष ठरले ज्यांना अविश्वास प्रस्तावाला सामोरे जावे लागले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.