

Mumbai News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांच्या अडचणी पुन्हा एकदा अडचणी वाढण्याची शक्यता आहे. चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकनाथ खडसे यांच्याविरोधात एसआयटी नेमण्याचे आदेश दिले आहेत.
मुक्ताईनगर येथे राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरणासाठी 25 जानेवारी 2022 मध्ये या संदर्भात अध्यादेश काढण्यात आला होता. या महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी सरकारनं एकूण 56.80 हेक्टर जमीन भूसंपादित करण्याचा मोठा निर्णय 13 जानेवारी 2023 ला जाहीर केला होता. या भूसंपादनाच्या प्रक्रियेदरम्यान गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी याप्रकरणी सभागृहात मुद्दा उपस्थित केला.
आता महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता मुक्ताईनगर महामार्ग विस्तारीकरण भूसंपादन प्रक्रियेदरम्यान गैरव्यवहार आरोपप्रकरणी विभागीय आयुक्त प्रविण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी नेमण्यात येणार असल्याचे जाहीर केलं आहे. ही एसआयटी तीन महिन्यांच्या आत अहवाल सादर करणार असल्याची माहितीही बावनकुळे यांनी यावेळी दिली.
तसेच बावनकुळे म्हणाले, जमीन गैरव्यवहार आरोप प्रकरण हा नऊ गावांचा प्रश्न असून त्यात 6 विभागाचे अधिकारी संबंधित आहेत, या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी करावी लागणार असून या संबंधीचा अहवाल सभागृहात सादर केला जाणार असल्याचंही बावनकुळे यांनी सांगितलं आहे.
भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी मुक्ताईनगर येथे राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरण आदेश सरकारनं 25 जानेवारी 2022 मध्ये जीआरद्वारे दिले होते. यासाठी 56.80 हेक्टर जमीन भूसंपादन करण्यात येणार असल्याचंही 13 जानेवारी 2023 रोजी स्पष्ट करण्यात आलं होतं. यानंतर याठिकाणी हाय वे होतोय याचा साक्षात्कार काही लोकांना झाला. त्यांनी संबंधित भूसंपादन प्रक्रियेतील जमिनीवर मोठ्या प्रमाणात झाडे लावून मोबदला घेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आमदारांनी यावेळी केला.
मंगेश चव्हाण म्हणाले, सरकारकडून यासंदर्भात नोटीस निघाल्यानंतर त्या जमिनीवर पूर्णपणे शासनाचा उतारा लागतो. उताऱ्यावर नोंद लागल्यानंतर मूळ मालकाचे सर्व अधिकार संपुष्टात येतात. मात्र, मोठा मोबदला लुटण्यासाठी एकनाथ खडसे यांनी 14 दिवसांनी 27 जानेवारी 2023 रोजी अधिसूचित झालेल्या जमिनीपैकी काही जमीन खरेदी केलीय 15 लाख 22 हजार रुपयांचे खरेदीखत दाखवल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.
यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसेंवर सरकारची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप करतानाच आमदार मंगेश चव्हाण यांनी खळबळजनक दावा केला आहे. ते म्हणाले, संबंधित जमीन ही 2022 मध्ये खरीप होती, तिथे कापसाचे पीकही घेतले जाते. पण तिथे 8 वर्षांपासून झाडे असल्याचं दाखवण्यात आलं, ही सरकारची फसवणूक असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.