

केंद्र सरकारने जुनी पेन्शन योजना (OPS) आणि नवीन पेन्शन योजना (NPS) यांच्याशी संबंधित काही प्रकरणांमध्ये पेन्शन सुरू करण्याची प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी सुधारित नियमावली जारी केली आहे. वित्त मंत्रालयाच्या केंद्रीय पेन्शन लेखा कार्यालयाने (CPAO) ही नवी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर (SOP) प्रसिद्ध केली आहे. यामुळे विशेषतः कर्मचाऱ्याचा मृत्यू किंवा अपंगत्व आल्याच्या प्रकरणांमध्ये नियमित पेन्शन किंवा कुटुंब निवृत्तीवेतन सुरू करण्याची प्रक्रिया अधिक स्पष्ट होणार आहे.
मात्र, या निर्णयाचा अर्थ सर्व NPS कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना निवडण्याची मुभा मिळाली आहे, असा होत नाही. ही प्रक्रिया ठरावीक पात्र प्रकरणांसाठी लागू आहे.
यापूर्वी 17 सप्टेंबर 2025 रोजी यासंदर्भात SOP जारी करण्यात आली होती. प्रत्यक्ष कामकाजात काही अडचणी समोर आल्यानंतर नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली. दिलेल्या माहितीनुसार, CPAO ने 19 ऑक्टोबर 2026 रोजी यासंदर्भात कार्यालयीन ज्ञापन जारी केले.
नवीन प्रक्रियेनुसार, संबंधित पात्र प्रकरणांमध्ये आधी दिलेला तात्पुरता पेन्शन आदेश रद्द करून नियमित पेन्शन पेमेंट ऑर्डर (PPO) जारी करण्याची कार्यपद्धती स्पष्ट करण्यात आली आहे. यामध्ये संबंधित सरकारी विभाग, पेन्शन लेखा कार्यालय, CPAO आणि बँकांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
सर्वप्रथम CPAO संबंधित पेन्शन लेखा कार्यालयाला जुन्या तात्पुरत्या पेन्शन आदेशाची प्रत उपलब्ध करून देईल. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे आणि कर्मचाऱ्याचे सर्व्हिस बुक तपासले जाईल. उपलब्ध माहितीच्या आधारे नवीन PPO तयार करण्याची प्रक्रिया सुरू होईल.
नवीन आदेश जारी करण्यापूर्वी कर्मचाऱ्याची सेवा, कागदपत्रे आणि जुन्या पेन्शन आदेशातील तपशीलांची पडताळणी केली जाईल. त्यानंतर हा आदेश CPAO कडे तपासणीसाठी पाठवण्यात येईल.