
PM Narendra Modi Speech : दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे राबवत पाकिस्तानला गुडघे टेकवायला भाग पाडले. भारतीय लष्कराकडून याबाबत सातत्याने सविस्तर माहिती दिली जात आहे. संरक्षणमंत्रीही याबाबत बोलले आहेत. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ऑपरेशननंतर एकदाही त्यावर भाष्य केलेले नाही.
पंतप्रधान मोदी आज पहिल्यांदाच देशवासियांना संबोधित करणार आहेत. रात्री आठ वाजता ते ऑपरेशन सिंदूरबाबत बोलणार असल्याची चर्चा आहे. मागील आठवड्यात दोन्ही देशांमध्ये मोठा संघर्ष झाल्यानंतर शनिवारी युध्दविरामाची घोषणा करण्यात आली. पण त्याच दिवशी पाकने त्याचे उल्लंघन केले. त्यानंतर मात्र भारताने पाकला कठोर इशारा दिला आहे.
यापार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी सध्याच्या घडामोडींवर काय बोलणार, पाकिस्तानसोबतचा युध्दकरार, सिंधू जलकरार तसेच पाकवर लादण्यात आलेले इतर निर्बंध, नव्याने काही निर्बंध लादले जाऊ शकतात का आदी विषयांवर कोणती घोषणा करणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान पहिल्यांदाच बोलणार असल्याने त्याकडे पाकिस्तानसह जगाचेही लक्ष असणार आहे.
दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी बिहार येथील कार्यक्रमात बोलताना दहशतवाद्यांना जमिनीत गाडणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार पाकिस्तानातील नऊ मोठे दहशतवादी तळ उध्वस्त करण्यात आले. त्यात तीन कुख्यात दहशतवाद्यांसह 100 हून अधिक दहशतवादी मारले गेल्याचे भारतीय लष्कराने स्पष्ट केले आहे. तसेच एलओसीवरील गोळीबारातही पाकचे 35 ते 40 सैनिक मारले गेल्याचे पाक लष्कराकडूनच सांगितले जात आहे.
सीझफायरच्या निमित्ताने दोन्ही देशांमध्ये पुन्हा संवाद सुरू झाला आहे. पण हा संवाद केवळ पहलगामनंतरच्या संघर्षापुरताच असणार की पुढेही सुरू राहणार, याबाबत स्पष्टता नाही. त्याबाबत पंतप्रधान मोदींनी आज भाष्य केले जाण्याची शक्यता आहे. पाकिस्तानबाबत भारताची यापुढील काळात कोणती भूमिका राहणार, याबाबत पंतप्रधान ठोसपणे देशाची भूमिका मांडू शकतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.