
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानाची मोठ्या प्रमाणात कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. भारताकडून युध्दाची तयारी केली जात असल्याची भीती पाकिस्तानला आहे. दहशतवाद्यांसह त्यांच्या आकांना सोडणार नाही, असा दम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भरला आहे. त्यानंतर पाकिस्तानी लष्करात खळबळ उडाली असून मागील काही दिवसांत शेकडो जणांनी राजीनामा दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
'साम टीव्ही'ने याबाबतचे वृत्त दिले आहे. पाकिस्तानी सैन्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. एकाचवेळी तब्बल 250 लष्करी अधिकारी आणि सुमारे 1200 सैनिकांनी सामुहिक राजीनामा दिल्याची माहिती आहे. त्यामुळे पाक लष्करावरील संकट अधिक गडद होऊ लागले आहे. पाकिस्तानी सैन्यामध्ये असंतोष आणि मानसिक दबाव वाढल्याचे वातावरण आहे.
भारत आणि पाकिस्तानच्या सीमेची सुरक्षा सांभाळणाऱ्या 11 व्या तुकडीचे कमांडर लेफ्टनंट जनरल उमर अहमद बुकारी यांनी लष्कर प्रमुखांना लिहिलेल्या पत्रामध्ये गंभीर चिंता व्यक्त केली आहे. राजीनामासत्राची कारणेही समोर आली आहे. लष्करी अधिकाऱ्यांचे सातत्याने बदलणार आदेश, मानसिक थकवा आणि कुटुंबावरील वाढत्या दबावामुळे सैनिकांकडून राजीनामा दिला जात आहे. त्याचा थेट परिणाम सीमेवर जाणवू लागला आहे. सीमेवर सैन्याची कमतरता जाणवत असल्याचे पत्रात म्हटले आहे.
लेफ्टनंट जनरल बुखारी यांनी या गंभीर स्थितीची माहिती लष्कर प्रमुख असीम मुनीर यांना दिली आहे. त्यानंतर मुख्यालयाने आदेश जारी करत राजीनामे न स्वीकारण्याची भूमिका घेतली आहे. सैन्य नियमांचे हे उल्लंघन असल्याचे मुख्यालयाने म्हटले आहे. तसेच राजीनामे देणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, मुख्यालयाकडून नेमके किती सैनिकांनी राजीनामे दिले आहेत, याची माहिती सार्वजनिक केलेली नाही. मात्र, त्यामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली असून नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहेत. एकीकडे भारतीय लष्कराकडून सीमेवर आक्रमकपणे युध्दाभ्यास केला जात आहे. नौदलासह हवाई दलानेही युध्दसामुग्रीची चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे पाकिस्तानला धडकी भरली आहे. त्यातच सैन्याचे मनोबल खच्ची होत असल्याने पाकिस्तानसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.