
UNSC Addresses Pahalgam Terror Incident : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. भारत कधीही हल्ला करण्याची भीती असल्याने पाकचा थयथयाट सुरू आहे. जगात भारताला उघडे पाडण्यासाठी पाकिस्तानने मोठ्या तोऱ्यात संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत धाव घेतली होती. मध्यरात्री बंद दाराआड झालेल्या चर्चेत पाकिस्तानची फजिती झाली आहे. परिषदेच्या तिखट प्रश्नांनी पाकिस्तानच जगासमोर उघडे पडले.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानची बोलती बंद झाली. पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे भारताने परिषदेत स्पष्ट केले आहे. हा आरोप पाकिस्तानला खोडून काढता आला नाही. मध्यरात्री सुरक्षा परिषदेची भारत आणि पाकिस्तानच्या सदस्यांसोबत महत्वाची बैठक झाली. बंद दाराआड झालेल्या या बैठकीतील चर्चेची माहिती आता समोर आली आहे.
पाकिस्तानला अडचणीत टाकणाऱ्या अनेक प्रश्नांची सरबत्ती या बैठकीत झाल्याचे समजते. सदस्य देशांनी पाकिस्तानवर पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत प्रश्न विचारले. या हल्ल्यामागे लष्कर-ए-तोयबाचा हात आहे का, दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या चालवल्या का, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. विशेष म्हणजे पाकनेच बंद दाराआड चर्चा करण्याची मागणी केली होती.
सुरक्षा परिषदेच्या सदस्यांनी पाकिस्तानचे दावेही खोडून काढले. सुत्रांच्या माहितीनुसार, सदस्य देशांनी हल्ल्याचा निषेध करताना त्याची जबाबदारी निश्चित करण्याबाबतची बैठकीत चर्चा केली. पाकिस्तानाची क्षेपणास्त्र चाचणी आणि अणुबॉम्बच्या वापराबाबतची विधाने तणाव वाढविणारी आहेत, अशी चिंताही व्यक्त करण्यात आली.
पाकिस्तानकडून हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत दोन्ही देशांनी संयम बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दोन्ही देशांनी आपआपसांत चर्चा करून यावर तोडगा काढावा, अशीही चर्चा झाल्याचे समझते. त्यामुळे पाकिस्तान तोंडघशी पडले आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने चर्चेची सर्व दारे बंद करून पाकिस्तानला अद्दल घडविण्यासाठी महत्वाची पावले टाकली आहे. त्यामुळे पाकिस्तानकडून थयथयाट सुरू आहे. चीन, तुर्की आदी देशांकडे हात पसरून मदत मागितली जात आहे. पण आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकला फारसे यश मिळताना दिसत नसल्याने भारताचे पारडे जड झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.