
Discussion on Constitution : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाल्यापासून लोकसभेसह राज्यसभेचे कामकाज सातत्याने तहकूब करावे लागत आहे. विरोधकांकडून उद्योगपती गौतम अदानी लाच प्रकरण आणि संभल घटनेवर चर्चा करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, त्याला परवानगी मिळत नसल्याने विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत असल्याने कामकाज तरकूब करावे लागत आहे. त्यावर सोमवारी दुपारी तोडगा निघाला आहे.
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्वपक्षीय बैठक घेत विरोधकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्याला यश मिळाले असून मंगळवारपासून दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरळीतपणे सुरू होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे या बैठकीत संविधानावर चर्चा करण्यासही सरकारकडून तयारी दर्शवण्यात आल्याने विरोधकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
केंद्रीय संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, संविधानावर लोकसभेत 13 आणि 14 डिसेंबर रोजी तर राज्यसभेत 16 व 17 डिसेंबर रोजी चर्चा होईल. त्याचप्रमाणे सर्व पक्षांनी संसदेचे कामकाज चालू देण्याबाबतही सहमती दर्शवली असल्याचे रिजिजू यांनी सांगितले. ओम बिर्ला यांनीच संविधानावर चर्चेचा प्रस्ताव ठेवला होता.
दरम्यान, महाराष्ट्रासह झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान संविधानाचा मुद्दा गाजला होता. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून प्रत्येक प्रचारसभेत संविधान दाखवून भाजपवर टीका केली जात होती. त्याला भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी संविधान पुस्तकाच्या लाल रंगावरून पलटवार केला होता. तसेच एका कार्यक्रमात संविधानाचे कव्हर असलेल्या कोऱ्या वह्या वाटण्यात आल्या होत्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यावरून राहुल गांधींसह काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला होता. या मुद्यावरून भाजप आणि काँग्रेसकडून आरोप-प्रत्यारोप केले जात होते. आता संविधानावर दोन दिवस संसदेत चर्चा होणार असल्याने पुन्हा एकदा सरकार आणि विरोधक आमनेसमाने उभे ठाकण्याची, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.