

नवी दिल्ली : नीट (NEET) आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीच्या घटनांवर कठोर कारवाई करण्याच्या दिशेने केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी NEET पेपरफुटी प्रकरणांशी संबंधित खटल्यांचा जलद निपटारा करण्यासाठी फास्ट-ट्रॅक न्यायालये (Fast-Track Courts) स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केली आहे.
या संदर्भात आवश्यक ती सर्व कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश संबंधित मंत्रालये आणि अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गुरुवारी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांचे हित आणि त्यांचे भविष्य हेच केंद्र सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे नमूद केले.
आपल्या तरुणांच्या कल्याणापेक्षा आणि भविष्यासाठी महत्त्वाचे दुसरे काहीही नाही," असे सांगत त्यांनी पेपरफुटीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या दोषींना शक्य तितक्या लवकर आणि कठोर शिक्षा मिळावी, यासाठी विशेष फास्ट-ट्रॅक न्यायालयांची स्थापना करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
मोदी म्हणाले, 'पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरते आणि त्यांच्या भविष्यासोबत अन्याय होतो. त्यामुळे अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने आधीच विविध उपाययोजना सुरू केल्या असून, फास्ट-ट्रॅक न्यायालयांचा निर्णय हा त्याच मालिकेतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. यासोबतच त्यांनी संबंधित अधिकारी आणि यंत्रणांना आवश्यक त्या सर्व कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. पेपरफुटीच्या गुन्ह्यांतील आरोपींवर त्वरित आरोपपत्र दाखल करून खटल्यांचा वेगाने निकाल लावण्यावर भर दिला जाणार आहे.
पंतप्रधानांनी आपल्या संदेशात स्पष्ट इशारा देत म्हटले की, "जे लोक आपल्या तरुणांच्या भविष्यासोबत खेळण्याचा प्रयत्न करतील, त्यांना कोणतीही दया दाखवली जाणार नाही. विद्यार्थ्यांचा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी आणि देशातील स्पर्धा परीक्षांची पारदर्शकता कायम राखण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
गेल्या काही वर्षांत विविध स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीच्या घटनांमुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सार्वजनिक परीक्षा (अनुचित साधनांचा प्रतिबंध) कायदा लागू करण्याबरोबरच तपास यंत्रणांना अधिक अधिकार दिले आहेत. आता फास्ट-ट्रॅक न्यायालयांच्या माध्यमातून अशा प्रकरणांचा जलद निपटारा करून दोषींना कठोर शिक्षा देण्याची प्रक्रिया अधिक वेगवान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.