

बिहार विधानसभा निवडणूक 2025 ची रणधूमाळी सुरू झाली असून, मतदारांना आकर्षित करण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) ने आपला जाहीरनामा म्हणजेच 'संकल्प पत्र' आज, 31 ऑक्टोबर जाहीर केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, मुख्यमंत्री नितीश कुमार आणि इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत या जाहीरनाम्याचे प्रकाशन झाले. बिहारच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देण्याचे आश्वासन एनडीएने या घोषणापत्रातून दिले आहे.
जाहीरनाम्यात युवक, महिला, शेतकरी आणि मागासवर्गीयांसाठी भरघोस योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. एनडीएने राज्यात एक कोटींहून अधिक नोकऱ्या आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे मोठे आश्वासन दिले आहे. प्रत्येक जिल्ह्यात ‘मेगा स्किल सेंटर’ स्थापन करून बिहारला ‘ग्लोबल स्किलिंग हब’ बनवण्याचा संकल्प मांडण्यात आला आहे.
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘लखपती दीदी मिशन’ सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत एक कोटी महिलांना वर्षाकाठी एक लाखांपेक्षा जास्त उत्पन्न मिळविणाऱ्या उद्योजिका बनवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. तसेच, ‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजना’ अंतर्गत महिलांना दोन लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत देऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी दिली जाणार आहे.
शेतकऱ्यांसाठी ‘कर्पूरी ठाकूर किसान सन्मान निधी’ या योजनेअंतर्गत दर हंगामात 3,000 रुपये म्हणजेच वर्षाला 9,000 रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. यासोबतच कृषी पायाभूत सुविधांमध्ये 1 लाख कोटींची गुंतवणूक आणि प्रत्येक पंचायतमध्ये किमान आधारभूत किंमत (MSP) वर खरेदी केंद्रे उभारण्याचे वचन देण्यात आले आहे.
अति मागासवर्गीय (EBC) कुटुंबांसाठी 10 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदतीची योजना आणि त्यांच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीसाठी विशेष समिती स्थापन करण्याचेही घोषणापत्रात नमूद आहे.
गरिबांसाठी ‘पंचामृत गॅरंटी’ या नावाने पाच मोठ्या कल्याणकारी योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. यात मोफत रेशन, 125 युनिट मोफत वीज, 5 लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य सेवा, 50 लाख पक्की घरे आणि सामाजिक सुरक्षा पेन्शन यांचा समावेश आहे.
पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सात नवीन एक्सप्रेसवे आणि चार शहरांमध्ये मेट्रो सेवा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच, पटनाजवळ ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचे आणि दरभंगा, पूर्णिया व भागलपूर विमानतळांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर आधुनिकीकरण करण्याचे वचन दिले आहे.
एकूणच, एनडीएने या जाहीरनाम्यात बिहारला 'विकासाचे मॉडेल ' बनविण्याचा संकल्प मांडला आहे, पण या जाहीरनाम्याचा फायदा होणार की तोटा? हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.