
New Delhi News : बांग्लादेशतील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद यूनुस सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी आतूर आहे. पण त्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूनुस यांना पत्र पाठवले आहे. बांग्लादेशच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधानांनी हे पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी 1971 मध्ये पाकिस्तानपासून बांग्लादेशला वेगळे करत भारताने स्वातंत्र्य मिळवून दिल्याची आठवण मोदींनी करून दिली आहे.
बांग्लादेशचा स्वातंत्र्य दिन 26 मार्चला साजरा केला जातो. यादिवशी 1971 मध्ये भारतीय लष्कराच्या मध्यस्थीमुळे पाकिस्तानपासून बांग्लादेश वेगळे झाले. पंतप्रधान मोदींनी पत्रात या ऐतिहासिक क्षणाचा उल्लेख केला आहे. 1971 मधील बांग्लादेश मुक्तीसंग्रामाला त्यांनी भारत आणि बांग्लादेशातील मजबूत संबंधांचा पाया म्हटले. बंग बंधू शेख मुजीबुर्रहमान यांचा वारसा मिटवण्याचा प्रयत्न होत असताना पंतप्रधान मोदींचे हे पत्र महत्वाचे मानले जात आहे.
बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात सत्तेतून हटवण्यात आले होते. त्यांच्याविरोधात देशात मोठे विद्यार्थी आंदोलन झाले. त्यानंतर शेख मुजीबुर्रहमान यांची प्रतिकांवर हल्ले झाले आहेत. यापार्श्वभूमीवर बांग्लादेशचा स्वातंत्र्य दिन आल्याने पंतप्रधान मोदींनी मोहम्मद यूनुस यांना पत्र लिहिले आहे. त्यांना या पत्रात बांग्लादेशातील नागरिकांना शुभेच्छाही दिल्या आहेत.
‘बांग्लादेशच्या मुक्तीसंग्रामाची भावना आपल्या संबंधांसाठी मार्गदर्शक बनली आहे. अनेक क्षेत्रांमध्ये ते दिसून येत असून त्याचा फायदाही होत आहे. शांतता, स्थिरता आणि समृध्दीसाठी ही भागीदारी पुढे नेण्यासाठी आम्ही प्रतिबध्द आहोत,’ अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी यूनुस यांना मैत्रीचा विश्वास दिला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी बांग्लादेशातून सत्ताबदलाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. लष्करप्रमुखांनी तातडीने घेतलेल्या बैठकीमुळे या चर्चांना पेव फुटले होते. दुसरीकडे शेख हसीना यांच्या राजकीय पुनरागमनावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत. सध्याच्या अंतरिम सरकारच्या काळात बांग्लादेशात अल्पसंख्यांक हिंदूवर हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्याचा भारताकडून निषेधही करण्यात आला. स्थानिक लोकांमध्येही सरकारविरोधात नाराजी आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.