Jansuraj Party News : प्रशांत किशोर... निवडणूक रणनीतीकार! आजपावेतो भाजप, तृणमूल काँग्रेस आदी विविध पक्षांसाठी रणनीती आखणारे प्रशांत किशोर आता स्वत: निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत.
प्रशांत किशोर येत्या 2 ऑक्टोबर रोजी म्हणजे गांधी जयंतिदिनी जनसुराज पार्टी हा नवा पक्ष स्थापन करणार आहेत. इतकंच नव्हे तर बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीत आपला पक्ष सर्व 243 जागा लढवणार असल्याचं सांगत निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे.
जनसुराज मोहिमेचे संस्थापक व निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) येत्या 2 ऑक्टोबर रोजी म्हणजे गांधी जयंतिदिनी जनसुराज पार्टी हा आपला नवा पक्ष स्थापन करणार आहेत.
लोकांना नवा राजकीय पर्याय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं आपण या पक्षाची स्थापना करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. याच दिवशी म्हणजे बरोबर दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या जनसुराज यात्रेदरम्यान त्यांनी याबाबतची घोषणा केली होती.
जनसुराज पक्षाची संघटना सांभाळण्यासाठी 21 प्रमुख नेत्यांची कार्यकारी समिती स्थापन करण्यात येणार आहे. बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीत आपला पक्ष सर्व 243 जागा लढवणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. जनसुराज यात्रेदरम्यान 5000 किमी चालल्याचा दावा त्यांनी केला आहे.
2014 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींना (Narendra Modi) पहिल्यांदा जिंकून आणण्यात प्रशांत किशोर यांनी आखलेल्या रणनीतीचा मोठा वाटा होता. त्यानंतर त्यांनी विविध राजकीय पक्षांना सत्तेत आणण्यासाठी रणनीती आखण्याचं काम केलं. 2021 च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला पश्चिम बंगालमध्ये पुन्हा सत्तेत आणण्यासाठी प्रशांत किशोर यांनी आखून दिलेली रणनीती महत्त्वाची ठरली
त्यानंतर त्यांनी निवडणूक रणनीतीकार म्हणून आपलं काम थांबवलं आणि 2 ऑक्टोबर 2022 पासून संपूर्ण बिहारमध्ये जनसुराज यात्रा काढून बिहारचा कोपर न कोपरा पिंजून काढला. त्यांनी पश्चिम चंपारण्य भागातून आपल्या यात्रेस सुरुवात केली होती. तेव्हापासून आजपर्यंत आपण 5000 किमी चालल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
बिहारच्या जनतेला नवा राजकीय पर्याय म्हणून माझा पक्ष
बिहारमध्ये सध्या राष्ट्रीय जनता दल, भाजप (Bjp), जनता दल संयुक्त या पक्षांचं राजकीय प्राबल्य आहे. मात्र, बिहारच्या जनतेसाठी कुणीही काही केले नाही, असं प्रशांत किशोर यांचं म्हणणं आहे. या पार्श्वभूमीवर, बिहारच्या जनतेला एक नवा राजकीय पर्याय म्हणून माझा पक्ष काम करेल, असा दावा प्रशांत किशोर यांनी केला आहे.
'किशोर - कुमार'ची जोडी जमली आणि फुटली!
प्रशांत किशोर यांनी याधी 'जेडीयू'च्या माध्यमातून राजकारणात उडी घेतली होती. पक्षात प्रवेश करताच नितीश कुमार यांनी त्यांची वरिष्ठ पदावर नियुक्तीही केली होती. मात्र हे 'किशोर - कुमार' नातं फार काळ टिकू शकलं नाही. जनसुराज पक्ष 2025 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत 75 मुस्लिमांना उमेदवारी देईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे.
भाजपाची 'बी टीम' असल्याचा आरोप
प्रशांत किशोर भलेही आपल्या नव्या पक्षाची स्थापना करत असले किंवा बिहारच्या जनतेला एक नव्या राजकीय पर्याय म्हणून आपला पक्ष काम करेल, असं म्हणत असले तरी त्यांची जनसुराज मोहीम म्हणजे भाजपाची 'बी टीम' असल्याचा आरोप प्रशांत किशोर यांच्यावर केला जात आहे. आता हा आरोप खोडून काढण्यात प्रशांत किशोर यशस्वी होणार का आणि बिहारमध्ये त्यांचा पक्ष 'जनसुराज' आणणार का, हे येणार काळच ठरवेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.