नवी दिल्ली : पंजाबमध्ये (Punjab) विविध विकासकामांच्या उदघाटनासाठी दाखल झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सुरक्षेत मोठी त्रुटी झाल्याच्या मुद्द्यावरून गदारोळ सुरू आहे. यावर अखेर पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी (Charajit Singh Channi) यांनीच खुलासा केला आहे. त्यांनी सुरक्षेत त्रुटी झाल्याचा आरोप फेटाळला आहे.
मुख्यमंत्री चन्नी म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी परत जावे लागले, याचे मलाही दु:ख आहे. पंतप्रधानांचा ताबा आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणापासून खूप अलिकडे थांबवण्यात आला होता. आंदोलकांना रस्त्यावरून बाजू करण्यास 10 ते 20 मिनिटांचा कालावधी लागेल याबद्दल पंतप्रधानांना कल्पना देण्यात आली होती. त्यांनी दुसरा पर्यायी मार्गही सुचवण्यात आला होता. परंतु, पंतप्रधानांनी माघारी जाणे पसंत केले.
पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही त्रुटी नव्हता आणि त्यांच्या ताफ्यावर हल्ला होण्यासारखी परिस्थिती नव्हती. मी स्वत: मोदींच्या स्वागतासाठी भटिंडा विमानतळावर जाणार होतो. मात्र, माझ्या सोबतच्या एका व्यक्तीचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे मी मोदींच्या स्वागतासाठी जाऊ शकलो नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
फिरोझपूरमध्ये पंतप्रधानांकडून आज विविध प्रकल्पांचे उदघाटन केले जाणार होते. दुपारी दीड वाजता हा कार्यक्रम नियोजित होता. त्यासाठी भाजपने जय्यत तयारीही केली होती. त्याआधी पंतप्रधान मोदी हुसेनवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारक येथे हेलिकॉप्टरने जाणार होते. पण पावसाळी वातावरणामुळे त्यांनी रस्त्याने जाण्याचा निर्णय़ घेतला. भटिंडा येथून हा मार्ग दोन तासांचा होता.
पंजाब पोलिस महासंचालकांनी सुरक्षा व्यवस्थेची खात्री केल्यानंतर पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा हुसेनवालाच्या दिशेने निघाल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली. हुतात्मा स्मारकापासून 30 किलोमीटर अंतरावरील एका पुलावर वाहनांचा ताफा आल्यानंतर काही आंदोलकांनी रस्ता अडवल्याचे लक्षात आले. त्यामुळे पंतप्रधानांना सुमारे 20 मिनिटे तिथेच थांबावे लागेल. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील ही मोठी त्रुटी होती, असेही गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
पंतप्रधान मोदींचे वेळापत्रक आणि प्रवासाचे नियोजन पंजाब सरकारला आधीच कळवले होते. त्यानुसार राज्य सरकारने सुरक्षा व इतर बाबींची योग्य खबरदारी घेणे आवश्यक होते. सरकारने रस्त्यावरील इतर गोष्टी थांबवण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था पुरवणे अपेक्षित होते. पण तसे करण्यात आले नाही. सुरक्षा व्यवस्थेतील या त्रुटींमुळे पुन्हा भटिंडा विमानतळाकडे जाण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने याची गंभीर दखल गेतली असून पंजाब सरकारकडून तातडीने अहवाल मागवला आहे. राज्य सरकारला याप्रकरणी जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कडक कारवाई करण्याच्या सुचना गृह विभागाने दिल्या आहेत. दरम्यान, तीन कृषी कायद्यांच्या विरोधी आंदोलनामुळे पंजाबसह इतर काही राज्यांतील शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकारविरोधात रोष आहे. त्याचा फटका थेट पंतप्रधान मोदी यांना बसल्याचे समोर आले आहे. शेतकरी आंदोलनानंतर पंतप्रधान मोदींनी बुधवारी पहिल्यांदाच पंजाबमध्ये पाऊल टाकले होते. पण शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा रस्त्यातच अडवल्याने हा कार्यक्रमच रद्द करण्याची नामुष्की ओढवली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.