

Punjab civic polls : पंजाबमध्ये नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी आम आदमी पक्षाने आपला करिष्मा पुन्हा एकदा दाखवून दिला आहे. महिनाभरापूर्वीच पक्षाचे राज्यसभेतील सहा खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यापार्श्वभूमीवर ही निवडणूक झाल्याने भाजप चमत्कार दाखविणार की नाही, याबाबत उत्सुकता वाढली होती. मात्र, आपने भाजपच्या मनसुब्यांवर झाडू फिरविला आहे.
राज्यात ८ महापालिका, ७५ नगरपरिषदा आणि २१ नगरपंचायतींसाठी नुकतेच मतदान झाले होते. शुक्रवारी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली असून आपने दणदणीत विजयाच्या दिशेने आगेकूच सुरू ठेवली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार आपने ६३० हून अधिक जागांवर विजय मिळवत राज्यात विरोधकांना झटका दिला आहे. पंजाबमधील मतदारांनी पुन्हा आपवर विश्वास दाखविला आहे.
निवडणुकांमध्ये काँग्रेसने २०० हून अधिक जागांवर विजय मिळविला आहे. तर विधानसभा निवडणुकीत विजय मिळविण्याचे मिशन हाती घेतलेल्या भाजपला सपाटून मार खावा लागला आहे. भाजपला आतापर्यंत ५० च्या जवळपास जागा मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे अपक्ष उमेदवारांनीही भाजपला मागे टाकत जवळपास २०० जागांवर विजय मिळविला आहे.
शिरोमणी अकाली दल १४० हून अधिक जागा जिंकत तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. आम आदमी पक्षाने विरोधात असलेल्या तिन्ही पक्षांना धूळ चारत विधानसभेची सेमीफायनल एकतर्फी जिंकल्याचे चित्र आहे. राज्यसभेच्या राज्यातील सात खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आपला या निवडणुकांमध्ये फटका बसू शकतो, असे वातावरण तयार झाले होते. मात्र, निवडणुकीवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळविल्यानंतर भाजपने पंजाबमध्ये सत्ता मिळविण्यासाठी मिशन हाती घेतले आहे. काही तासांपूर्वीच भाजपने प्रदेशाध्यक्षही बदलले आहेत. यापार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालांनी भाजपला धक्का दिला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी आता अवघे काही महिने उरले आहेत. ही निवडणूक म्हणजे विधानसभेची सेमीफायनल मानली जात होती. त्यात आपने बाजी मारत विरोधकांचा सुपडा साफ केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.