
Karnataka Chief Election Officer Responds : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरूवारी सकाळी पत्रकार परिषद घेत आणखी एक धमाका केला. कर्नाटकातील आळंद मतदारसंघातील 6 हजार 18 मतदारांची नावे हटविण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. याबाबत आता भारतीय निवडणूक आयोगानेही कबुली दिली आहे. डिसेंबर 2022 मध्ये हा प्रकार घडला होता. आयोगाने याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी यांनी आपल्याला आता निवडणूक आयोगातूनही माहिती मिळत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आयोगातून राहुल यांना कोण माहिती पुरवतंय, अशी चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर आयोगानेच राहुल गांधी यांना ही माहिती कुठून मिळाली असावी, याबाबत सूचक संकेत दिले आहेत.
कर्नाटक निवडणूक आयोगाने राहुल गांधींच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, डिसेंबर 2022 मध्ये आळंदमध्ये निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांना फॉर्म नंबर 7 चे 6 हजार 18 अर्ज प्राप्त झाले होती. हे अर्ज आयोगाच्या विविध अप्सवरून आले होते. या अर्जांबाबत अधिकाऱ्यांना संशय आल्यानंतर प्रत्येक अर्जाची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये केवळ 24 अर्ज योग्य आढळून आले. उर्वरित अर्ज फेटाळण्यात आले.
निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीनंतर फेब्रुवारी 2023 मध्ये आळंद पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्याआधारे गुन्हा दाखल करण्यात आला. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी तपास पूर्ण करण्यासाठी 6 सप्टेंबर 2023 रोजी कलबुर्गी जिल्ह्याच्या पोलिस अधिक्षकांकडे आयोगाकडील सर्व माहिती देण्यात आली.
पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये हरकती घेतलेल्यांची त्यांच्या नावांसह इतर माहिती, फॉर्म नंबर, ईपीआयसी क्रमांक, लॉग इनसाठी वापरण्यात आलेला मोबाईल नंबर, प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी देण्यात आलेला क्रमांक, सॉफ्टवेअर अप्लिकेशन मिडीयम, आयपी अड्रेस, अर्जदाराचे ठिकाण, फॉर्म दिल्याची तारीख आणि वेळ आदी सर्व माहिती पोलिसांनी दिल्याचे कर्नाटक निवडणूक आयोगाने सांगितले आहे.
राहुल गांधींच्या आरोपांनंतर आयोगाने यापूर्वी सगळी माहिती दिल्याचे सांगत राहुल गांधींच्या आरोपांमधील हवा काढण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच राहुल यांनी कर्नाटक पोलिसांकडून आजच्या पत्रकार परिषदेतील संपूर्ण माहिती घेतली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक आयोगातून कुणीतरी त्यांना मदत करत असेल, याबाबतही साशंकता निर्माण झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.