
Rajya Sabha CISF allegation : राज्यसभेत मंगळवारी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. राज्यसभेत CISF, मिलिर्टीचे जवान आणल्याच्या काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या आरोपांवरून जोरदार हंगामा झाला. संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू, मंत्री जे. पी. नड्डा यांनीही कडक शब्दांत त्यांना प्रत्युत्तर दिल्याने वाद आणखी वाढला.
राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर काहीवेळातच विरोधकांकडून होत असलेल्या गोंधळावर नाराजी व्यक्त केली. त्यांना तारखांसह माहिती देत विरोधकांनी कशाप्रकारे कामकाजात व्यत्यय आणला याचा पाढाच वाचला. अत्यंत कडक शब्दांत मध्ये त्यांनी विरोधकांना फटकारले. यादरम्यानही विरोधकांकडून व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.
विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे यांनी उपसभापतींच्या विधानानंतर बोलण्यास सुरूवात केली. खर्गेंनी उपसभापतींना लिहिले पत्र वाचून दाखवले. त्यामध्ये त्यांनी राज्यसभेत सीआयएसएफचे जवान बोलावण्यावरून तीव्र नाराजी व्यक्त केली. सभागृहात लोकशाही पध्दतीने अडथळे आणून सरकारला बोलण्यास भाग पाडणे हे आमचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सभागृहात मिलिट्री, सीआयएसएफचे जवान आणल्याचा आरोपही त्यांनी केला.
हरिवंश यांनी मात्र खर्गेंच्या विधानावर आक्षेप घेत ते जवान संसदेच्या सुरक्षा दलातील असल्याचे स्पष्ट केले. पण त्यानंतरही खर्गेंची आक्रमकता कमी झाली नाही. उपसभापतींनी आक्रमक पवित्रा घेत त्यांना बोलण्यापासून रोखले. त्यानंतर किरेन रिजिजू यांनी सभागृहात मार्शल बोलावण्यात आले होते, सीआयएसएफचे जवान नव्हते, असे स्पष्ट केले. सभागृहात केवळ मार्शल येऊ शकतात. त्यादिवशीही मार्शलच होते. विरोधी पक्षनेते संभ्रम निर्मण करत असून चुकीची माहिती देत असल्चे रिजिजू म्हणाले.
त्यावर खर्गेंनीही लगेच पलटवार करत उपसभापतींना उद्देशून हे सभागृह तुम्ही चालवत आहात की अमित शाह, असा सवाल केला. तेव्हा उपसभापतींनी खर्गेंची मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न केला. नड्डा यांनीही खर्गेंसह विरोधी खासदारांना सरकारचा विरोध कसा करायचा याची ट्यूशन माझ्याकडून घ्या, असा टोला लगावला. मी 40 वषे विरोधी पक्षात होतो. तुम्हाला आता 10 वर्षे झाली आहेत. आणखी 30-40 वर्षे तिथे बसावे लागणार आहे. त्यामुळे माझ्याकडून त्याची ट्यूशन घ्या, असे विधान नड्डांनी केले. त्यावरही विरोधकांनी जोरदार आक्षेप घेत हंगामा सुरूच ठेवला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज काही काळासाठी तहकूब करावे लागले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.